TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा व्याज दरवाढ करण्याची शक्यता; गेल्या ७ वर्षात कधीच न घडलेली गोष्ट करणार RBI

नवी दिल्लीः जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात महागाईतून सर्वसामान्य जनतेला किंचित दिलासा मिळाला आहे. मात्र, जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांत किरकोळ महागाईचा दर ६ टक्क्यांहून अधिक राहिला, जो रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मर्यादा पातळीच्या वर आहे. अशा स्थतीतीत आता ६ एप्रिल रोजी होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना किंचित दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली असून भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर फेब्रुवारीमध्ये ६.४४ टक्क्यांवर घसरला आहे, जो जानेवारीमध्ये ६.५२ टक्क्यांच्या तीन महिन्यांच्या उच्चांकावर होता. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीतून माहिती मिळाली मात्र, चलनवाढीचा दर अजूनही रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मर्यादा पातळीच्या वरच राहिला.

महागाईबाबतीत आरबीआयची मर्यादा पातळी ६% आहे. अशा स्थितीत सलग दुसऱ्या महिन्यात देशातील किरकोळ चलनवाढ केंद्रीय बँकेच्या मर्यादा पातळीच्या वर राहिली, जे पाहता आरबीआय पुन्हा एकदा दरवाढ करत रेपो दर सात वर्षांच्या सर्वोच्च पातळीपर्यंत वाढवू शकते.

अन्नधान्याच्या किमती घटल्या
गेल्या महिन्यात जागतिक तसेच देशांतर्गत बाजारात गव्हासारख्या अन्नधान्याच्या किमती कमी झाल्या असून सरकारने देखील पुरवठा वाढवला आहे. याचा परिणाम किरकोळ महागाईच्या आकडेवारीवरही झाला आणि गेल्या महिन्यातील अन्नधान्य महागाईचा दर ५.९५ टक्क्यांवर आला. तर जानेवारीत अन्नधान्य महागाईचा दर ६ टक्के होता. तसेच एक वर्षांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी २०२२ मध्ये अन्नधान्य महागाई दर ५.८५ टक्के होता.

व्याजदर वाढणार
जानेवारी महिन्यात किरकोळ महागाई ६.५२ टक्के होती, जी डिसेंबरमध्ये ५.७२ टक्क्यांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेली किरकोळ चलनवाढ रिझर्व्ह बँकेला पुन्हा एकदा व्याजदर वाढवण्यास प्रवृत्त करू शकते. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक येत्या ६ एप्रिल रोजी होणार असून यामध्ये सलग व्याज दरवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. म्हणजे सर्वसामान्य कर्जदारांना खिशातून आणखी पैसे मोजण्यासाठी तयार राहावे लागेल.

याशिवाय २२ मार्च रोजी यूएस फेड रिझर्व्हच्या व्याजदरांच्या निर्णयावर देखील भारतीय रिझर्व्ह बँक नजर ठेवून असेल. लक्षात घ्या की आरबीआयने गेल्या वर्षी मे २०२२ पासून प्रमुख व्याजदर २.५ टक्क्यांनी वाढवले आणि रेपो दर ६.५ टक्क्यांवर नेऊन ठेवला. पण आता नवीन आकडेवारीनुसार रेपो दर आणखी वाढल्यास तो ६.७५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button