सांगलीत आलेल्या गव्याची नैसर्गिक अधिवासात सुटका; तब्बल १८ तासांनंतर पथकाला यश
![सांगलीत आलेल्या गव्याची नैसर्गिक अधिवासात सुटका](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/sangli-gava.jpg)
सांगली |
सांगलीच्या बाजार समिती आवारात अडकलेल्या गव्याची तब्बल १८ तासांनंतर बुधवारी सकाळी सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात बचाव पथकाला यश आले. गव्याच्या उजव्या डोळय़ाला जंगलातच दुखापत झालेली असून कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घालणारा हाच गवा वडगावमार्गे सांगलीत आला असल्याची माहिती मानद वन्य जीवरक्षक अजित पाटील यांनी दिली. मंगळवारी पहाटे सांगलीत आलेला गवा तत्पूर्वी सांगलीवाडी परिसरात वास्तव्यास होता. त्याची सुरक्षित पाठवणी करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी पाळतीवर असताना त्याने मंगळवारी पहाटे सांगलीची वेस ओलांडून शहरात प्रवेश केला.
वाट मोकळी दिसेल त्या मार्गाने त्याने बाजार समितीच्या आवारातील मध्यवर्ती गोदामाचा आश्रय घेतला असता वन विभागाने दोन्ही बाजूचे मार्ग रोखले. यामुळे दिवसभर तो त्याच जागी होता. त्याने वाहनात सुरक्षित प्रवेश करावा यासाठी जेसीबीच्या मदतीने तीन फूट खड्डाही खोदण्यात आला. अखेर मध्यरात्री दीड वाजता तो वाहनात शिरताच गेट बंद करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाळवेकर यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याच वाहनाने त्याची रवानगी आज सकाळी साडेसात वाजता करण्यात आली.
शहरात आलेला गवा ११ वर्षांचा पूर्ण वाढ झालेला नर होता. त्याचे वजन १५०० किलो असल्याने गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्याचा पर्याय अस्वीकार्ह होता. यामुळेच त्याने वाहनात प्रवेश करावा यासाठी बचाव पथकाचे प्रयत्न होते आणि तब्बल १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ते यशस्वी झाले. ऑपरेशन गवा बचावमध्ये वन विभाग, महसूल, महापालिका आणि प्राणिमित्र यांची मदत झाल्याचे वन विभागाचे उपवनसंरक्षक विजय माने यांनी सांगितले.