इतर मागास वर्ग आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन
![Rasta Rocco movement for other backward class reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/marathwada.jpg)
उस्मानाबाद | इतर मागासवर्गीय समाजाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम ठेवावे, या मागणीसाठी ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने उस्मानाबाद येथे सोमवारी रास्ता रोको करण्यात आले. आरक्षण कायम ठेवावे, यासाठी आंदोलकांनी विविध घोषणा देऊन रास्ता रोको केला.प्रशासकीय पदोन्नतीमध्ये आरक्षण कायम ठेवावे व ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ते पुन्हा द्यावे व तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, जातीनिहाय जनगणना करावी, नोकरीतील पदोन्नती आरक्षण कायम ठेवावे, या मागण्यांसाठी समता परिषदेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष महादेव माळी, जिल्हा उपाध्यक्ष बिभीषण खुने, प्रदेश चिटणीस आबासाहेब खोत, परंडा तालुकाध्यक्ष नंदू शिंदे, भूम तालुकाध्यक्ष संतोष डोरले, कळंब तालुकाध्यक्ष प्रा. राजेंद्र खडबडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे, ओबीसी आरक्षण बचाव समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय शिंगाडे, तेली समाज युवक प्रदेशाध्यक्ष रवी कोरे आळणीकर, ओबीसी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन चौधरी, जिवा सेना जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे आदी जण सहभागी झाले होते.
आज घंटानाद आंदोलन
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी राजकीय आरक्षण बचाव समितीच्यावतीने उद्या (मंगळवारी) सकाळी ११ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. शहरातील सांजावेस गल्लीतील जंगम मठात रविवारी घेण्यात आलेल्या ओबीसी राजकीय आरक्षण बचाव समितीच्या बैठकीत मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या घंटानाद आंदोलनाची रुपरेषा निश्चित करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय आरक्षण कायम ठेवण्याची मागणी करण्यात येणार आहे.