२८ ऑक्टोंबरला नंदुरबार जिल्ह्यात ऊस परिषद, राजू शेट्टी उपस्थित राहणार
![Raju Shetty, Sugarcane Council will be present in Nandurbar district on 28th October](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/raju-shetti-1.jpg)
नंदुरबार – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी हे येत्या गुरूवारी २८ ऑक्टोंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रकाशा येथे माजी खासदार शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊस परिषद घेण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रश्न प्रलंबित असून अद्यापपर्यंत सुटलेले नाहीत. त्याचप्रमाणे पपई व केळी उत्पादकांचे देखील प्रश्न प्रलंबित आहेत. ऊस, केळी व पपई उत्पादकांचे प्रश्न सुटावेत यासाठी गेल्या काही वर्षांपासून संघटना लढा देत आहे. त्यानुसार समाधानकारक भाव मिळत होता.
सध्या गेल्या दोन वर्षांपासून पपई उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट होत आहे. समाधानकारक भाव मिळत नाही. महावितरणकडून देखील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. यामुळे विविध प्रश्न सोडविण्यासाठी २८ ऑक्टोंबरला राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.