कोल्हापूर कारागृहात कैद्याचा थेट अधीक्षकावर हल्ला, पत्र्याच्या तुकड्याने केला वार; कारण…
![कोल्हापूर कारागृहात कैद्याचा थेट अधीक्षकावर हल्ला, पत्र्याच्या तुकड्याने केला वार; कारण...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/कोल्हापूर-कारागृहात-कैद्याचा-थेट-अधीक्षकावर-हल्ला-पत्र्याच्या-तुकड्याने-केला-वार.jpg)
कोल्हापूर |
कैद्याने कारागृहातच अधीक्षकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात घडली. कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदलकर यांच्यावर कारागृहातच कैद्याने हल्ला केला. मात्र, चंद्रमणी इंदलकर यांच्या सावधतेमुळे ते थोडक्यात बचावले. या घटनेत इंदलकर यांच्या हाताला दुखापत झाली आहे. बुधवारी कारागृहातील बराकीच्या तपासणीच्या वेळी ही घटना घडली.
कैद्याचा पत्र्याच्या तुकड्याने अधीक्षकावर हल्ला
कळंबा कारागृहात आज (बुधवार) सकाळी कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदलकर हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह बराकीची तपासणी करत होते. एका बराकीत तपासणी करत असताना एका कैद्याने त्यांच्यावर पत्र्याच्या तुकड्याने हल्ला केला. यावेळी सावध असलेल्या अधीक्षक इंदलकर यांनी कैद्याचा हल्ला हातावर झेलला. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी कैद्याला पकडलं म्हणून मोठी दुर्घटना टळली. या हल्ल्यात अधीक्षक इंदलकर यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांच्यावर कारागृहातील वैद्यकीय कक्षात उपचार करण्यात आले.
वॉचमॅन पदावरून हटवल्याचा राग
हल्ला करणारा कैदी हा रत्नागिरीहून सप्टेंबर २०२१ मध्ये कळंबा कारागृहात आला होता. त्याच्याकडे वॉचमॅनचे काम दिले होते. वॉचमॅनचे काम करत असताना त्याने दुसऱ्या कैद्याला मारहाण केली होती. त्यामुळे त्याला वॉचमन पदावरुन हटवण्यात आले होते. त्याचा राग मनात धरत त्याने थेट कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदलकर यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती पुढे आली आहे.