वैष्णवी हगवणे प्रकरणात राजकीय साखळी; रोहिणी खडसेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी!

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून 23 वर्षीय वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. या प्रकरणात तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा आणि सासरा राजेंद्र हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपी राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे सदस्य असल्याने या घटनेला राजकीय वळण लागले आहे.
या प्रकरणावरून शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी केली आहे. त्यांच्या मते, या प्रकरणातही बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखे राजकीय नेक्सस आहे आणि त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते.
रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे की, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली, परंतु दीड दिवस एफआयआर दाखल करण्यात उशीर झाला. एफआयआरमध्येही सौम्य कलमांचा वापर करण्यात आल्याने आरोपींना फायदा होतो आहे. वैष्णवीच्या शरीरावर 29 ठिकाणी जखमा असल्याचे नमूद असूनही, गंभीर कलमे न लावणे म्हणजेच पोलिसांकडून आरोपींच्या बाजूने भूमिका घेण्यात आली आहे, असा रोख रोहिणी खडसे यांनी घेतला.
हेही वाचा – ..तर पाकिस्तानचे चार तुकडे होतील; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
रोहिणी खडसे यांनी याआधीच्या संतोष देशमुख प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, पोलिसांकडून योग्य तपास न झाल्याने जेव्हा केस सीआयडीकडे गेली, तेव्हाच खरे तथ्य बाहेर आले. त्यामुळे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातही सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.
खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही केस सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी करताना स्पष्टपणे सांगितले की, आरोपी हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे पोलीस यंत्रणेवर दबाव टाकला जात असल्याचा संशय निर्माण होतो.
वैष्णवी हगवणे प्रकरणाचा सत्य तपास व्हावा, पोलिसांवरील संभाव्य दबाव दूर व्हावा आणि पीडितेला न्याय मिळावा, यासाठी ही केस सीआयडीकडे वर्ग करावी, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.