ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चार वर्षांत दोनशेवर अधिकारी- कर्मचाऱ्यांना शौर्य पदक

गडचिरोली पोलीस दलातील १७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य पदक

गडचिरोली : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवाची बाजी लावून नक्षल्यांशी दोन हात करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील १७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर झाले आहे, तर एका पोलीस अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक घोषित झाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

देशभरातील पोलीस दलात तसेच सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा राष्ट्रपतींनी देशभरात एकूण २०८ पोलीस शौर्य पदक व ६२४ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर केले असून, त्यापैकी गडचिरोली पलीस दलास १७ शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी एक पदक जाहीर झाले आहे.

यामध्ये गडचिरोलीत अपर पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावलेले व सध्या वाशिमचे पोलीस अधीक्षक असलेले अनुज तारे, उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, सहायक निरीक्षक राहुल देव्हडे, उपनिरीक्षक दीपक औटे, विजय सपकाळ, हवालदार महेश मिच्चा, कोतला कोरामी,नागेशकुमार मादरबोईना, समय्या आसम,महादेव वानखेडे,विवेक नरोटे, मोरेश्वर पोटावी, अंमलदार कोरके वेलादी, कैलास कुळमेथे, शकील शेख, विश्वनाथ पेंदाम यांना राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक मिळाले असून, उपनिरीक्षक मधुकर नैताम यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहे. शहीद उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांना मरणोत्तर शौर्य पदक जाहीर झाले आहे.

कापेवंचा, मोरमेट्टा चकमकीची दखल
सन २०१७ मध्ये मौजा कापेवंचा-कवठाराम, सन २०१९ मध्ये मोरमेट्टा व सन २०२२ मध्ये कापेवंचा-नैनेर येथे झालेल्या पोलीस- नक्षलवादी चकमकीमध्ये एकूण चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली पोलीस जवानांना यश प्राप्त झाले होते. वरील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सदरच्या चकमकीमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले.

९६ जणांना पदोन्नती
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला ४१ हवालदारांना सहाय्यक फौजदारपदी व ५५ पोलीस नाईक अंमलदार यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती मिळाली आहे. राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त व पदोन्नती प्राप्त पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे.

चार वर्षांत दोनशेवर अधिकारी- कर्मचाऱ्यांना शौर्य पदक
यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला १८ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व १ पोलीस अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले होते. २०२४ मध्ये एकूण ३५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व २ अधिकारी व अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहे. मागील चार वर्षांत जिल्हा पोलीस दलास एकूण ३ शौर्य चक्र, २०३ पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ८ पदक प्राप्त झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button