“सरकारच्या माध्यमातून धंदा करणाऱ्या लोकांनी राजकीय भाष्य करू नये”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Nawab-Malik.jpg)
मुंबई – भाजपचे माजी खासदार आणि नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीमध्ये घुसमट होत आहे, अशा प्रकारचं मोठं विधान केलं होतं. तसेच ते लवकरच महाविकास आघाडीमधून बाहेर पडतील, असंही संजय काकडे यांनी बोलून दाखवलं. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणात संजय काकडे यांच्यावर पलटवार केला आहे. संजय काकडेंवर पलटवार करताना नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, “सरकारच्या माध्यमातून धंदा करणाऱ्या लोकांनी राजकीय भाष्य करू नये आणि धंदेबाज लोकांनी स्वतःचे धंदे बघावे, आमचं सरकार कसं चालवायचं ते आमचा आम्ही बघू”.
संजय काकडे यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीने त्यांना सडेतोड उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, संजय काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी चांगला ओळखतो. त्यांच्या आतापर्यंतच्या वक्तव्यावरुन आणि बोलण्यावरून त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत असल्याचं दिसुन येत आहे. तसेच ते गेली 25 वर्ष युतीमध्ये होते. त्यामुळे मला त्यांच्यासाठी वाईट वाटत आहे. अशा शब्दात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्य केलं होतं.
“महाविकास आघाडी सरकारमध्ये धंदेबाज लोकांची दखल घेतली जात नाही, त्यामुळे असे धंदेबाज लोक कितीही काहीही बोलले तरी त्याचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही”, अशा शब्दात नवाब मलिक यांनी संजय काकडे यांच्यावर पलटवार केल्याचं पाहायला मिळालं.