breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरीच्या पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन सुरु

पंढरपूर : आता कोठे धावू मन …तुझे चरण देखिलिया या भंगा प्रमाणे सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची तृष्णा आता भाविकांची संपली आहे. पंढरीच्या पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन म्हणजेच देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन आज पासून म्हणजेच रविवारपासून सुरु झाले. देवाची पहाटे चार वाजता नित्यपूजा होऊन पहिल्या भाविकांना फुले देवून मंदिर समिती स्वागत केल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. मंदिराचे संवर्धनाचे काम सुरु असून ७०० ते ८०० वर्षापूर्वी असलेले काळ्या पाषाणातील आणि कोरीव नक्षीकाम अशा पुरातन शैलीतील मंदिराचे रुपडे दिसत आहे. त्यात सावळ्या विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.

आज पहाटे पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि दर्शन रांगेतील पहिले वारकरी बालाजी मुंडे यांच्या उपस्थितीत विठ्ठलाची नित्य महापूजा झाली. आणि या महापूजेनंतरच पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. यावेळी वारकरी सांप्रदायिक प्रमुख महाराज मंडळीही उपस्थित होते. या वेळी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी होती. पदस्पर्श दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धन व जतन करणेकामी राज्यसरकारने १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या माध्यमातून मंदिराचे पूर्णपणे संवर्धन केले जात आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे. या मध्ये मंदिरात बसवलेले ग्रेनाईट,टाईल्स , विविध रंग रंगोटी आदी बदल सुचविण्यात आले आहेत. त्या नुसार दि १५ मार्च पासून मंदिरातील संवर्धनाचे काम सुरु झाले. यामध्ये मंदिरातील १६ खांबी,चौखांबी ,देवाचे गर्भगृह, सभामंडप,बाजीराव पडसाळी तसेच रुक्मिणी मातेचे देखील गर्भगृह, चौखांबी आदी ठिकाणचे काम सुरु झाले.मंदिरातील दरवाजे व अन्य ठिकाणी बसविण्यात आलेल्या चांदी काढण्यात आली. तसेच देवाच्या मूर्तीवर असलेले मेघडंबरी देखील काढण्यात आली. मंदिरात सर्वच ठिकाणी टाईल्स बसवण्यात आल्या होत्या. त्या काढून पूर्वी मंदिरात असलेली दगडी फरशी ठेवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी दगडी फरशी तुटली आहे त्या ठिकाणी त्याच पाषाणाची फरशी बसविण्यात आली. तसेच देवाच्या गर्भगृहात देखील बसविण्यात आलेली ग्रेनाईट आणि इतर टाईल्स अतिशय काळजी पूर्व काढण्यात आल्या. सध्या मेघडंबरीचे काम सुरु आहे.लवकरच हे बसविण्यात येणार आहे.

मंदिरात त्या काळी दगडावर अतिशय कोरीव नक्षीकाम केले होते. ते नक्षीकाम नीट दिसत नव्हते. विविध देव देवताच्या मूर्ती,आकर्षक नक्षीकाम आणि पूर्णपणे काळ्या पाषाणात मंदिर दिसून येत आहे. सुमारे ७०० ते ८०० वर्षापूर्वी जसे मंदिर होते तसे मंदिराचे रुपडे दिसत आहे. या संवर्धनाच्या कामामुळे देवाचे लांबून आणि पहाटे पाच ते सकाळी अकरा वाजेपर्यंत दर्शन सुरु होते. आता मंदिरातील काही कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. रविवारी म्हणजे आज पासून देवाचे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. मंदिरातील संवर्धनाचे काम पुढे दीड ते दोन वर्ष सुरु राहील . मात्र आषाढी यात्रे पूर्वी सोळखांबी,चौखांबी,सभामंडप,गाभारा आदी कामे पूर्ण करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी धिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी … कृपाळू तातडी उतावीळ या अभंगाप्रमाणे साक्षात पांडुरंगाला आता भक्तांना भेटण्याची उत्सुकता लागली आहे अशी भावना वारकर्‍यांची झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button