मर्जीतील चालक, वाहकांचा अतिकालीन भत्ता बंद; एसटी महामंडळ चालक, वाहकांची वर्गवारी करून भत्ते देणार

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील मर्जीतील काही चालक, वाहकांनाच अतिकालीन भत्ता मिळत होता. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत होता. याबाबत एसटी महामंडळात आढावा बैठक घेऊन प्रमाण कार्यपद्धती तयार केली. याद्वारे एसटी महामंडळातील चालक आणि वाहकांची त्यांच्या कर्तव्यानुसार वर्गवारी करून भत्ते देण्यात येणार आहेत.
वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि दैनंदिन उत्पन्नाचा ताळमेळ जुळविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून एसटी महामंडळाने चालक आणि वाहकांच्या अतिकालीन भत्ता नियमावलीत मोठे बदल केले आहेत. यापुढे अतिकालीन भत्ता देताना ‘कमी मूळ वेतन’ असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. यासंदर्भात एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी (वाहतूक) १९ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून सर्व विभाग नियंत्रकांना पाठवले.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दैनंदिन उत्पन्न वाढवण्याच्या संदर्भात नुकताच आढावा बैठक घेतली. यामध्ये अतिकालीन भत्त्याबाबत होणाऱ्या खर्चावर नियंत्रण नसल्याचा विषय पुढे आला. अतिकालीन भत्ता काही मर्जीतील ठराविक चालक, वाहकांनाच दिला जातो, अशा तक्रारी कामगारांकडून येत होत्या. या पार्श्वभूमीवर अतिकालीन भत्त्या संदर्भात एक ‘प्रमाण कार्यपद्धती’ वापरावी, असे निर्देश सरनाईक यांनी दिले. त्याअनुषंगाने खर्चात काटकसर करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.
हेही वाचा – देशात नवीन कामगार संहिता लागू; केंद्रीय श्रममंत्र्यांची मोठी घोषणा
नवीन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी
-राज्यातील प्रत्येक आगाराने चालक, वाहकांच्या वेतनानुसार अ, ब, क अशी वर्गवारी केली जाईल. अतिकालीन भत्ता हा ‘क’ गटातील कर्मचाऱ्यांना दिला जाईल. कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. जेणेकरून आर्थिक बोजा कमी होईल.
-कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यास दुबार कर्तव्याचे नियोजन करून, त्याचा मासिक आराखडा केला जाईल.
-कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी दुबार कर्तव्याचे वेळापत्रक १० दिवस आधीच फलकावर लावणे अनिवार्य असेल.
-कोणत्याही परिस्थितीत चालक किंवा वाहकांची साप्ताहिक सुट्टी रद्द केली जाणार नाही.
-अतिकालीन चालवल्या जाणाऱ्या फेरीतून मिळणारे उत्पन्न हे अतिकालीनच्या खर्चापेक्षा जास्त असायला हवे.
काटकसरीच्या उपायांसोबतच वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. गर्दीच्या दिवशी किंवा सणासुदीला रजा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रजेच्या कारणांचा अभ्यास करावा, असे परिपत्रकात म्हटले आहे.




