breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

आपली संस्कृती… आपला अभिमान : महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायाची पताका सातासमुद्रापार!

विठू नामाच्या गजराने दुमदुमली ह्युस्टन नगरी! : महाराष्ट्र मंडळाच्या वतीने अमेरिकेत पहिल्यांदाच वारी

रोझेनबर्ग। ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळ (HMM) च्या वतीने नुकतेच ह्युस्टनजवळील रोझेनबर्ग शहरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे उद्घाटन मोठ्या आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले. प्रतिष्ठापना सोहळ्यादरम्यान येथील भाविकांनी विठू नामाचा गजर करीत दिव्य असा भक्तिमय अनुभव घेतला.

आषाढी वारीच्या निमित्ताने पहाटे ५ वाजता उत्सवाला वारीने सुरुवात झाली होती. पहाटेच ८० हून अधिक लोक विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती घेऊन पारंपरिक पवित्र वारीच्या माध्यमातून मार्गस्थ झाले. HMM मंदिर समितीचे अध्यक्ष अभिषेक भट यांच्या नेतृत्वाखाली वारी जसजशी पुढे जात होती तसतसा सहभाग वाढताना दिसत होता.

शंभराहून अधिक लोक मार्गावर विविध ठिकाणी वारीत चालू लागले. विठ्ठल- रखुमाईच्या नामघोषाने भारलेली वारी १४ मैलांच्या प्रवासानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास मंदिरात येऊन पोचली. अमेरिकेत पहिल्यांदाच अशा भव्यदिव्य वारीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात आल्यानंतर भक्तांच्या अंतःकरणातील अथांग प्रेम आणि भक्ती दर्शवणारी आरती करून वारीत चालणाऱ्या वारकरी भक्तांचे स्वागत करण्यात आले, अशी माहिती हिमांशू फिरके यांनी दिली.

वारीचा क्षण हृदयस्पर्शी…

वारीचे आगमन हा हृदयस्पर्शी क्षण होता, ज्याची येथील मराठी समाज अनेक दशकांपासून वाट पाहत होता. मोरया ढोल ताशा ग्रुपच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ढोल ताशा आणि रिंगणाच्या दणदणाटात वारीचे स्वागत करण्यात आले आणि उत्सवाच्या वातावरणात भर पडली.

ढोल ताशाच्या गजरात वारी…

ढोल ताशा सादरीकरणानंतर पूजेला सुरुवात झाली. दुपारीपर्यंत सर्व देवतांच्या प्राणप्रतिष्ठापनाची पूर्तता झाली, त्यानंतर भव्य महाआरती, होम हवन आणि महाप्रसाद झाला. या उत्सवाला ६०० हून अधिक लोकांची उपस्थिती होती. उत्साही लोकसहभागामुळे या मंदिराचे उद्घाटन हा सगळ्यांसाठीच एक संस्मरणीय असा अनुभव झाला.

पाच नद्याचे पाणी अन्‌ कोल्हापूरचे कुंकू…

या मंदिरात आता गणपती बाप्पा, कोल्हापुरच्या महालक्ष्मीसह विठ्ठल रुक्मिणीच्या दगडी मूर्ती स्थापन झालेल्या आहेत. भारतातील प्रसिद्ध कारागीर शाहीर चेतन हिंगे यांनी साकारल्या आहेत. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतातील पाच महत्त्वाच्या नद्यांचे पाणी आणले गेले, शिवाय कोल्हापूरच्या अंबाबाईकडील हळदी-कुंकूसुद्धा ह्युस्टन येथे आणले गेले.

महाराष्ट्रातील नागरिकांचा एकोपा…

मंडळाच्या सर्व स्वयंसेवकांच्या चमूने गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यक्रमासाठी नियोजन केले आणि परिश्रम घेतले. विठू माऊली, रुक्मिणी माऊली, गणपती बाप्पा आणि अंबाबाई यांच्या आशीर्वादाने हे सर्व प्रयत्न फळाला आले आणि एक दीर्घकाळचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले गेले आहे. या कार्यासाठी निधी उभारण्यात, समाजाशी संपर्क करण्यात, आणि हे स्वप्न साकार करण्यात मराठी म्हणून अभिमान बाळगणाऱ्या अगणित व्यक्तींनी मोलाचे योगदान दिले आहे.

ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ काय आहे?

ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळ (HMM) ही एक सामुदायिक संस्था आहे जी महाराष्ट्र, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी समर्पित आहे. विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांद्वारे, HMM त्याच्या सदस्यांमध्ये समुदायाची आणि संबंधितांची सहजीवनाची भावना वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रापार जपणारे हे मंडळ निश्चितच आदर्शवत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button