‘मोंथा’ चक्रीवादळामुळे एकाचा मृत्यू; कोकणातील समुद्र खवळला, विदर्भाला तडाखा बसणार

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे कोकणाती समुद्र खवळला आहे. चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकून ओडिशाच्या दिशेने सरकले असून, त्यामुळे 15 जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला असून, 2 जण जखमी झाले आहेत. तर या चक्रीवादळाचा राज्यातील विदर्भाला फटका बसणार आहे. वादळी वाऱ्यासह, जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अरबी समुद्रात उठलेल्या वादळांमुळे मासेमारीसाठी गेलेल्या तीन बोटींचा संपर्क तुटला आहे. उरणमधील न्हावा शेवा गावातील या तीन बोटी असून यावर जवळपास 50 खलाशी आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
एकीकडे मोंथा वादळाचा तडाखा आणि दुसरीकडे कोकण किनारपट्टीला पावसाचा असलेला अंदाज लक्षात घेत समुद्र खवळण्याची शक्यता आहे.त्यामुळे मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया ही जलवाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
मंगळवारी (ता. २८) रात्री उशिरा हे तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या मच्छलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकिनाडाजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर ही प्रणाली आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगडमधून उत्तर भारताकडे जाणार आहे. त्यामुळे या राज्यांसह विदर्भात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारी जिल्ह्यात आधीच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.




