“आता माझा एककलमी कार्यक्रम…”, मुंबै बँक चौकशी प्रकरणी प्रविण दरेकरांचा इशारा!
!["Now my one-stop program", Pravin Darekar's warning in Mumbai Bank inquiry case!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/mumbai-bank.jpg)
मुंबई |
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या मुंबै बँक कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश सहकार विभागाने दिले आहेत. यासाठी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या ३ महिन्यांत हा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या चौकशीवर आणि राज्य सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे. तसेच, पुणे जिल्हा सहकारी बँक आणि राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेवर देखील घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले आहेत.
- “…हा सरकारचा केविलवाणा प्रयत्न!”
चौकशीचे आदेश दिल्यानंतर प्रविण दरेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर निशाणा साधला. “सरकारवर मी वेगवेगळ्या मुद्द्यांवर टीका करत आहे. मला कुठल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवता येतं का, याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. टेस्ट ऑडिट झाल्यानंतर कायद्यानुसार ३ महिन्यांचा अवधी कॉम्प्लायन्स रिपोर्ट देण्यासाठी असतो. पण सरकारला इतकी घाई झाली आहे, की त्याआधीच त्यांनी चौकशीची प्रक्रिया सुरू केली”, असं दरेकर यावेळी म्हणाले.
- अशा चौकशांना भीक घालत नाही!
“सगळ्या आरोपांची उत्तरं जिल्हा बँक देईल. याआधीही दिली आहे. अशा प्रकारे सूडानं आणि आकसानं कितीही वागलं, तरी विरोधी पक्षनेत्याचा आवाज तुम्हाला दाबता येणार नाही. अशा चौकशांना मी भीक घालत नाही. गेल्या काही वर्षांत बँकेला पुढे नेण्याचं काम सर्व पक्षीय संचालकांना सोबत घेऊन मी केलं आहे. गेली १० वर्ष बँकेला अ वर्ग मिळाला आहे”, असं प्रविण दरेकर यांनी यावेळी सांगितलं.
“बरबटलेल्या हातांनी चौकशी काय करणार? राज्य सहकारी बँकेची अर्धवट चौकशी पुन्हा सुरू करा. मी पत्र देणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाघोटाळा आहे. त्यांची खरेदी बघा. १५-२० कोटींचं सॉफ्टवेअर १५० कोटींना घेतलंय. राज्यातल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँका आणि सहकारी संस्थांची रीतसर तक्रार आम्ही करणार आणि घोटाळ्याच्या महाराष्ट्रातल्या महामेरूंना उघड करणार. प्रविण दरेकरचा एककलमी कार्यक्रम आता सहकारातले घोटाळे बाहेर काढणं हा आहे”, असं दरेकर यावेळी म्हणाले.