राज ठाकरे यांना रात्री उशिरा मुंबई पोलिसांकडून नोटीस
![सर्वांत मोठी बातमी : राज ठाकरे यांना रात्री उशिरा मुंबई पोलिसांकडून नोटीस](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/सर्वांत-मोठी-बातमी-राज-ठाकरे-यांना-रात्री-उशिरा-मुंबई.jpg)
मुंबई |
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भात ४ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. या अल्टीमेटमवर राज ठाकरे ठाम आहेत. राज ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. राज ठाकरे यांना कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांना ही नोटीस दिली आहे. राज ठाकरेंनी भोंगे उत्तरवण्यासंदर्भात उद्याचा अल्टिमेटम दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना कलम १४९ अंतर्गत मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंबईतील मनसेच्या विभागप्रमुखांना पुढील १५ दिवस शहराबाहेर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज ठाकरे यांच्या आवाहनामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मुंबई पोलीस आणि अतिरिक्त पोलीस बळ तैनात करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरुन उद्या मशिदींबाहेर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावण्याचे आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांना कलम १४९ अंतर्गत नोटीस देऊन पोलीस कायदेशीर प्रक्रिया राबवत आहेत. राज ठाकरे यांच्यावर १ मे रोजी औरंगाबाद येथे झालेल्या सभेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद पोलिसांनी घातलेल्या १६ अटीपैकी १२ अटींचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे.
- राज ठाकरे भूमिकेवर ठाम
“देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे. आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही.”
“कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, या देशात, या राज्यात ‘कायद्याचं राज्य’ आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. त्यांनी अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा.”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.