नितेश राणेेंच्या अटकपूर्व जामिनावर गुरुवारी सुनावणी
![Nitesh Rane's pre-arrest bail hearing on Thursday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Nitesh-Rane-Supreme-Court.jpg)
नवी दिल्ली | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी आता गुरुवार, 27 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यापूर्वी मुंबई हायकोर्टाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळून लावला होता.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रकरणी राजकीय संघर्षातून शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे आमदार नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप परब यांनी केला होता. याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये म्हणून सुरुवातीला नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टातही धाव घेतली. पण दोन्हीकडे त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. पण पुढच्या सुनावणीपर्यंत त्यांना अटक करु नये असे हायकोर्टाने म्हटले होते. त्यामुळे नितेश राणेंना काहीसा दिलासा मिळाला होता. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आता गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांना दिलासा मिळणार का? हे पाहावे लागणार आहे.