breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#NisargCyclone: ‘निसर्गा’च्या प्रकोपामुळे रायगडकर हैराण; १ लाखापेक्षा अधिक घरांची पडझड

निसर्ग वादळाच्या प्रकोपामुळे रायगडकर हैराण झाले आहेत. जिल्ह्यात वादळाच्या आपत्तीमुळे दगावलेल्या व्यक्तींची संख्या चार वर पोहोचली आहे. ३९ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्याने, बहुतांश रायगड जिल्हा अंधारात आहे, दूरसंचार यंत्रणा ठप्प आहेत. वादळाच्या या तडाख्यातून सावरण्यासाठी जिल्ह्याला बराच कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वादळाचा सर्वाधिक तडाखा, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, माणगाव, रोहा तालुक्यांना बसला आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यातील मांजरवणे येथे सुरेश काते यांचा अंगावर खांब पडल्याने  मृत्यू झाला. तर देवलीकोंड येथे घराचे छत व भिंत कोसळून निलम सत्वे या महिलेचा मृत्यू झाला. श्रीवर्धन येथील सायगाव येथे भिंत पडून अमर जावळेकर या तरुणाचा जीव गेला, तर अलिबाग तालुक्यातील उमटे येथे दशरत वाघमारे यांचा अंगावर रोहीत्र पडून मृत्यू झाला. वादळामुळे जिल्ह्यातील ७९९ शाळा आणि अंगणवाड्यांचे नुकसान झाले. तर १ लाख १० हजार घरांची पडझड झाली. वादळात जिल्ह्यातील ३७४ कार्यालये, ७ गोदामे तर २ रुग्णालयांची पडझड झाली. आत्तापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात ३९ जनावरांचाही वादळात मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

जिल्ह्यातील ६ हजार ७६६ हेक्टर क्षेत्रावरील शेती आणि फळबागांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. महावितरणचे ३ हजार ५०० उच्च दाब क्षमतेचे खांब, ५ हजार १०० लघु दाब क्षमतेचे खांब आणि २५० रोहित्रांची वादळात मोडतोड झाली आहे. विद्यूत पुरवठा सुरळीत होण्यासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील १० मच्छीमार बोटी आणि १२ हजार हेक्टर मत्स्य शेतीचे नुकसान झाले आहे. दुरसंचार यंत्रणाही ठप्प झाली आहे. आयडीया कंपनीचे १२६ टॉवर बंद आहेत. जीओ कंपनीचे १४३ मोबाईल टॉवर बंद पडले आहेत. दक्षिण रायगड मधील बीएसएनएलची यंत्रणाही कोलमडली आहे. ही यंत्रणा सुरळीत करण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. वादळ आले आणि निघूनही गेले आहे. पण त्याच्या प्रकोपाची झळ रायगडकरांना आगामी काळातही सोसावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button