क्रिडाटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

न्यू सम्राट, भैरवनाथ, एमएच स्पोर्ट्स, पतंगराव कदम संघाची विजयी सलामी

  • जिल्हास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा : मृत्युंजय, श्रमदान, धर्मवीर संघ पराभूत

पुणे : मुलांच्या गटातून न्यू सम्राट, भैरवनाथ तर मुलींच्या गटातून एमएच स्पोर्ट्स, पतंगराव कदम संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे अमच्युअर्स संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या गटाच्या कबड्डी स्पर्धेत आगेकूच केली. स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे मनपाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, उद्योजक युवराज निंबाळकर, आयोजक उमेश गालिंदे, सुरेश राऊत, रेखा गवईकर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुलांच्या गटात न्यू सम्राट सुस, संघाने मृत्युंजय खराडी संघाला ३४–९ असे एकतर्फी पराभूत करताना विजयी सलामी दिली. मध्यंतराला न्यू सम्राट संघाने १६-४ अशी १२ गुणांची आघाडी घेतली होती. न्यू सम्राट संघाकडून अथर्व मानमोडे व वेदांत मानमोडे यांनी आक्रमक चढाया करताना गुणांची कमाई केली. करण वायकर व ऋषिकेश देशमुख यांनी सुरेख पकडी करताना संघाच्या विजयात हातभार लावला. पराभूत संघाकडून राहुल गायकवाड, कैलास जेठे यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

याच गटात भैरवनाथ क्रीडा संस्था संघाने श्रमदान संघाला ३२-११ असे पराभूत केले. मध्यंतराला भैरवनाथ संघाने १६-३ अशी आघाडी घेतली होती. भैरवनाथ संघाकडून निखील धावडे, सचिन शेलार, संकेत लांडगे यांनी दमदार खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून अक्षय पाटील, सौरभ कांबळे यांनी चांगली लढत दिली.

मुलींच्या गटात एमएच स्पोर्ट्स संघाने धर्मवीर संघाला ३५-७ असे २८ गुणांनी पराभूत करताना विजय साकारला. एमएच स्पोर्ट्स संघाने मध्यंतराला १५ -३ अशी आघाडी घेतली होती. विजयी संघाकडून प्रतीक्षा कऱ्हेकर, शोभा खैरे, आदिती चौघुले, जागृती पवार यांनी दमदार खेळ करताना संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पराभूत संघाकडून याशिका सुर्वे, कावेरी तांगडे यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

मुलींच्याच गटात पतंगराव कदम संघाने ब्रम्हा विष्णू महेश संघाला ४७-२४ असे २३ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला पतंगराव कदम संघाने १८-८ अशी १० गुणांची महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. सानिका खाडे व वैभवी कंधारे यांनी चढाया तर, आकांक्षा साबळे व भक्ती चाकणकर यांनी पकडी करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून शिवानी पवार व अमृता जाधव यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button