कोथुर्णेतील पीडितेच्या पालकांच्या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा ज्योती गोफणे
![NCP Working President Jyoti Gofane meets the parents of the victim in Kothurna](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-08-10-at-11.50.53-AM-1.jpeg)
कोथुर्णे | पवन मावळातील कोथुर्णे गावात सात वर्षीय चिमुकलीची अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. चिमुकलीला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे पीडितेच्या कुटुंबियांसोबत असून अशाप्रकारे कोवळ्या कळ्या खुडणाऱ्या नराधमांना मृत्युदंड ही एकच शिक्षा देण्यात यावी, अशी संतापजनक प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा ज्योती गोफणे यांनी व्यक्त केली.
कोथुर्णे गावातील घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असताना या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच पीडित परिवाराचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना भावनिक आधार दिला.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना कार्याध्यक्षा ज्योती गोफणे म्हणाल्या की, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. आजही समाजात अशाप्रकारचे राक्षस वावरत असून अशा राक्षसांपासून आपल्या कोवळ्या जीवांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही संपूर्ण सुज्ञ समाजाची आहे. अशा राक्षसी प्रवृत्तीना कायद्याचा धाक बसावा यासाठी मृत्युदंड हीच शिक्षा देण्यात यावी. या घटनेमुळे फक्त हळहळ व्यक्त करून चालणार नाही. तर याविरोधात आपण जागरूक राहावे आणि अशा नीच प्रवृत्तींना फणा काढण्याआधीच ठेचावे, अशी संतप्त प्रतिक्रिया गोफणे यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा मेधा पळशीकर, सोशल मीडिया अध्यक्षा संजविनी पुराणिक, अंजुषा निर्लेकर, सफाई कामगार अध्यक्ष सुवर्णा निकम या पदाधिकारी उपस्थित होत्या.