राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याकडून हैदराबाद गॅझेटला विरोध
राज्यात पुन्हा एकदा हैदराबाद गॅझेटचा मुद्दा तापण्याची शक्यता

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनानंतर सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला आहे. मात्र या जीआरवरून आता राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे. या जीआरला ओबीसी समाजामधून जोरदार विरोध होत आहे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने-सामने आला आहे.
दरम्यान दुसरीकडे याच गॅझेटवरून आदिवासी समाज आणि बंजारा समाज देखील आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यानंतर आता बंजारा समाजाकडून आमचा समावेश हा एसटी प्रवर्गात करा अशी मागणी सुरू झाली आहे, बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजाकडून मोठा प्रमाणात विरोध होत आहे. त्यामुळे राज्यात सध्या हैदराबाद गॅझेटवरून वातावरण चांगलंच तापलं आहे.
त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी हैदराबाद गॅझेटवर प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. आदिवासी हा शेड्यूल्ड ट्राईब आहे, बाकीचे लोक आणि बंजारा समाज यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, ते चुकीचे आहे. एसटी आणि व्हीजेएनटी हे दोन्ही वेगवेगळे आहेत, त्यांना आदिवासीमध्ये घेण्याचा प्रश्नच नाही. हैदराबाद गॅझेटियर महाराष्ट्रात लागू होत नाही, त्यांनी हैदराबादला जावं, हैदरबादशी आमचं काही देणं घेणं नाही, असं आत्राम यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की ,महाराष्ट्रात चंद्रपूर गॅझेटर आहे, आमच्या जवळ भरपूर संख्या आहे, आदिवासींच्या 25 जागा येऊ शकतात. आवश्यकता पडल्यास रस्त्यावर उतरू, शेड्यूल्ड ट्राईब आणि नोमेडिक ट्राईब हे वेगवेगळे आहेत. अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाजाला घेण्याचा प्रश्नच नाही, असं धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं आहे.
काय आहे बंजारा समाजाची मागणी?
हैदराबाद गॅझेटच्या जीआरनुसार आमचा समावेश हा एसटी प्रवर्गात करा अशी मागणी आता बंजारा समाजाकडून सुरू झाली आहे, आपल्या या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे, तर दुसरीकडे या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध होत आहे.