नाशिक महापालिका स्वतः उभारणार १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन
![Nashik Municipal Corporation will set up 106 electric charging stations by itself](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/jpg.jpg)
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिका स्वतः १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करणार आहे. त्यासाठी महापालिकेने एका खासगी कंपनीसोबत बीओटी तत्त्वावर ही केंद्रे उभारण्याची तयारी दर्शवली आहे. या कामासाठी तज्ज्ञ सल्लागारही नियुक्त करण्यात आल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. खरे तर या स्टेशन उभारणीसाठी स्मार्ट सिटीकडे आलेल्या राजस्थान येथील एका कंपनीने उत्सुकता दाखवली होती. मात्र, कंपनीच्या अटी योग्य नसल्यामुळे आयुक्तांनी नकार कळवत पालिकेतर्फे असे स्टेशन उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी नगररचना विभागाला प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता २५ पेक्षा अधिक सदनिका असलेल्या सोसायट्यांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सक्ती करण्यात येणार आहे. ५१ पेक्षा अधिक घरे असतील तर त्या ठिकाणी दोन इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सक्तीचे करण्यात आले आहेत. पूर्ण वाणिज्य क्षेत्र पाचशे चौरस मीटरपर्यंत असेल तर दोन चार्जिंग स्टेशन आणि पाचशे चौरस मीटरपेक्षा जास्त असेल तर चार चार्जिंग स्टेशनची सक्ती करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनच्या नियमाची २१ डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक मोठ्या गृहनिर्माण संस्थांचे बांधकाम प्रस्ताव सादर करताना त्यात ही तरतूद आहे की नाही, हे पाहिले जात आहे. चार्जिंग स्टेशनची सोय नसल्यास त्या प्रकल्पाला परवानगी मिळणार नाही.