अटकेनंतर पहिल्यांदाच पार पडली नारायण राणेंची जाहीर सभा; म्हणाले “आवाज गेलाय पण…”
![Narayan Rane's public meeting was held for the first time after his arrest; Said "the sound is gone but"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/rane-6.jpg)
रत्नागिरी |
१९ ऑगस्टला मुंबईतून सुरु झालेली जन आशीर्वाद यात्रा शुक्रवारी रत्नागिरीत पोहोचली आहे. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार आहे. महाडमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केल्यानंतर शिवसेना-भाजपा आमने-सामने आली होती आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता. पुन्हा दोन दिवसानंतर आता जन आशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे. यावेळी नारायण राणे यांनी रत्नागिरीत शेतकऱ्याशी संवाद साधताना आशिर्वाद द्यावेत यासाठी मी तुमच्याकडे आलो असून तुम्ही सर्वांनी जे स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचा अतिशय ऋणी आहे असे म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा शुक्रवारपासून सुरु झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसांची ही यात्रा असणार आहे. शुक्रवारी नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेत संवाद साधला आहे. यावेळी नारायण राणे यांनी कोकणातील शेतकऱ्याशी संवाद साधताना आवाज गेला तरीपण बोलण्याचा मी प्रयत्न करतोय असे म्हटले. “आपल्या पंतप्रधानांसाठी, माझ्यासाठी आपण आशिर्वाद द्यावेत यासाठी मी तुमच्याकडे आलो. तुम्ही सर्वांनी जे स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचा अतिशय ऋणी आहे. गेला आठवडाभर फिरुन आवाज गेला तरीपण बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. औषधं बरीच खाल्ली पण अजून आराम मिळत नाही. पण कोकणी माणूस भेटला की बोलल्याशिवाय राहवत नाही,” असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. वादग्रस्त विधानामुळे झालेली अटक आणि त्यानंतर जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी यात्रेचा पुनश्च शुभारंभ केला आहे. यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला त्यांनी रत्नागिरीत सुरुवात केली आहे.