नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग : २०४ किलोमीटरच्या सुधारित संरेखनास राज्य सरकारची मंजुरी

मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूर – चंद्रपूर असा करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार या महामार्गाच्या संरेखनात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) काही बदल केले होते. त्यानुसार सुधारित संरेखनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता देऊन संरेखन अंतिम केले. यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. या शासन निर्णयानुसार आता नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्ग २०४.७९९ किमी लांबीचा असणार आहे. सुधारित संरेखनाला मान्यता देतानाच राज्य सरकारने या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या २,३५३.९४ कोटी रुपयांच्या खर्चालाही प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गाचा विस्तार विदर्भात नागपूर – चंद्रपूर, नागपूर – गोंदिया आणि भंडारा – गडचिरोली असा करण्यात येणार आहे. या तिन्ही महामार्गांच्या बांधकामासाठी एमएसआरडीसीने निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होण्यास बराच वेळ लागणार असल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतरच नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा – इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ‘कुंभदूत’ एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण
दरम्यान, नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला पर्यावरणासंबंधी परवानगी मिळाली होती. मात्र या प्रकल्पात बाधित होणाऱ्या वनक्षेत्रात घट करता येईल का, याचा विचार करून सुधारित संरेखन तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार एमएसआरडीसीने संरेखनात बदल करून यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला होता. या प्रस्तावास मान्यता देऊन शुक्रवारी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला.
या शासन निर्णयानुसार २०४.७९९ किमी लांबीच्या या महामार्गात ११.९६९ किमी लांबीचा चंद्रपूर जोडरस्ता समाविष्ट आहे. नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्गासाठीच्या भूसंपादनासाठी १,४९३.३१ कोटी रुपये आणि ८६०.६३ कोटी रुपयांच्या संभाव्य व्याजासह एकूण २,३५३.९४ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार आता हुडकोकडून कर्ज घेण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. सुधारित संरेखनानुसार पर्यावरण परवानगीसाठी यापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यास लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करून येत्या काही महिन्यांतच या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यानंतर नागपूर – चंद्रपूर प्रवास तीन ते साडेतीन तासांऐवजी केवळ दोन तासांत करता येणार आहे.




