मनसेचा गुढी पाडव्याचा टीझर लॉन्च; राज ठाकरे यांची तोफ धडाडणार
![MNS Gudi Padwa Teaser Launch; Raj Thackeray's cannon will explode](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Raj-Thackeray-780x470.jpg)
मुंबई | संपुर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकबी उमेदवार घोषित केला नाही. त्यामुळे मनसे निवडणूक लढवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या ९ एप्रिल रोजी मिळणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात या सर्व मुद्द्यांवर सविस्तर बोलणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मनसेचा गुडी पाडव्याचा टीझर लॉन्च झाला आहे. यामध्ये राज ठाकरे यांचे भाषण करतानाचे व्हिज्युअल्स दाखवण्यात आले आहेत. तसेच मनसेच्या जुन्या गुढी पाडवा मेळाव्याची शिवाजी पार्कवरील गर्दीही यात दाखवण्यात आली आहे. राजकारणाची झाली दशा, राजविचार दाखवणार महाराष्ट्राला दिशा, असं या टीझरमध्ये म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणाची गरज असल्याचंही या टीझरमध्ये म्हटलं आहे. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राज साहेब ठाकरे यांचा विजय असो या घोषणाही या टीझरमध्ये ऐकायला येत आहेत.
हेही वाचा – चव्हाणांनी नाकारली ‘तुतारी’ची ऑफर, काँग्रेसच्या चिन्हावर ठाम
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टिझर आज मनसेकडून रिलिज कऱण्यात आला…@mnsadhikrut @mnsreport9 @RajThackeray #mns#MaharashtraPolitics pic.twitter.com/NE1hKR48ZX
— Avesh Tandale (@iamavesh007) April 2, 2024
येत्या ९ एप्रिल रोजी मराठी नववर्ष दिन म्हणजे गुढी पाडवा आहे. संध्याकाळी ४ वाजता दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेने गुढी पाडव्याचं आयोजन केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. यानंतर मनसे भाजप युतीच्या चर्चेला सुरूवात झाली होती. यावेळी मनसेकडून युतीकडे तीन जागांची मागणी करण्यात आली होती, अशी चर्चा आहे. मात्र, त्यानंतर पुढे काहीच घडलं नाही. त्यामुळे दिल्लीत आणि मुंबईत काय घडलं याबाबत राज ठाकरे गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.