राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी

Sangram Jagtap | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अहमदनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी आमदार जगताप यांचे खासगी स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाइलवर संदेशाद्वारे प्राप्त झाली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा संदेश सुहास शिरसाठ यांच्या मोबाइलवर आला असून, त्यात आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून संदेशाचा तपास आणि तांत्रिक विश्लेषण सुरू आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आहेत. आता त्यांना जिवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. आमदार जगताप यांचे खासगी स्वीय सुहास शिरसाठ (वय ३७, रा. बुरुडगाव रस्ता, अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरसाठ हे आज, बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास बाजार समिती चौक येथे असताना एका अनोळखी क्रमांकावरून त्यांच्या मोबाइलवर संदेश आला. यात ‘संग्राम को दो दिन के अन्दर खत्म करुंगा’ अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.