‘मविआ’-‘एमआयएम’ युतीच्या चर्चांवर रामदास आठवलेंची कविता; ‘एमआयएम’ला दिला स्वबळावर लढण्याचा सल्ला
![‘Mavia’ - Poem by Ramdas Athavale on ‘MIM’ alliance discussions; Advised MIM to fight on its own](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/RAMDAS.jpg)
मुंबई |
एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावावरून सध्या अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांकडून या विषयावर प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आठवले यांनी आपल्या शैलीत कविता केली आहे. रामदास आठवले यांनी याबद्दलचं ट्वीट केलं आहे. यावेळी त्यांनी एमआयएमला स्वबळावर लढण्याचा सल्लाही दिला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ”एमआयएमची आहे हार्डलाईन, त्यामुळे सर्वांनी केले आहे त्यांना साईडलाईन. एमआयएमशी कोणी युती करीत नसेल तर त्यांनी एकट्याच्या बळावर लढावे.”
एकीकडे भाजप महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याची भाषा करतं आहे. पण दुसरीकडे ओवेसींच्या एमआयएमकडून महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवल्याचीही चर्चा आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखीच उधाण आले. पण शिवसेना नेते, मुख्यमंत्री तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडूनही युतीबाबत नकार देण्यात आला.
एम आय एम ची आहे हार्डलाईन
त्यामुळे सर्वांनी केले आहे त्यांना साईडलाईन !
एम आय एम शी कोणी युती करीत नसेल तर त्यांनी एकट्याच्या बळावर लढावे.— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 20, 2022
शिवसेनेला एमआयएमने आघाडीसाठी दिलेली ऑफर हा भाजपचा कट आहे. शिवसेनेच्या बदनामीसाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेनेला ‘जनाब सेना’ असे संबोधणाऱ्यांनी आपला इतिहास तपासून घ्यावा असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.