महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडेंना त्यांच्या हॉटेलवरुन ट्रोल
‘स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते संदीप देशपांडे यांना ‘इंदुरी चाट आणि बरंच काही…’ या त्यांच्या उपहारगृहावरुन ट्रोल केलं जातय. भाजप कार्यकर्ते त्यांना फेसबुकवर ट्रोल करत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे हे मराठी भाषा, स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत हक्क हे मुद्दे लावून धरतात. अलीकडच्या काही महिन्यात मनसेने मराठी भाषेवरुन अनेकदा भाजपची कोंडी केली. आता भाजप कार्यकर्त्यांनी संदीप देशपांडे यांना त्यांच्या उपहारगृहावरुन कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काही महिन्यांपूर्वी दादरच्या मध्यवर्ती भागात ‘इंदुरी चाट आणि बरंच काही…’हे उपहारगृह सुरु केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानापासून काही मिनिटांवर हे उपहारगृह आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
इंदुरी चाट हा मध्य प्रदेशातील पदार्थ आहे. या उपहारगृहाच नावच इंदुरी चाट आहे. या उपहारगृहाचा कुक सुद्धा परप्रांतीय आहे. आता हाच धागा पकडून भाजप कार्यकर्ते संदीप देशपांडे यांच्यावर टीका करत आहेत. नुकतीच सुप्रसिद्ध व नामांकित शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी संदीप देशपांडेंच्या ‘इंदुरी चाट आणि बरंच काही…’ भेट दिली. संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केली होती. “सुप्रसिद्ध व नामांकित शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी दादर येथील मी सुरु केलेल्या “इंदुरी चाट आणि बरंच काही….”या उपहार गृहाला भेट दिली” अशी संदीप देशपांडे यांनी X वर पोस्ट केली होती. त्यावरुनच आता त्यांना ट्रोल केलं जातय.
‘हमारे संदीप भय्या के दुकान मे अनेका हा’
“या हॉटेलचा कूक परप्रांतीय ,या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करत आहेत ते पण परप्रांतीय ,यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही, आणि ते मराठी महापौर करण्याच्या गप्पा मारतात. महापौर मराठीच होणार, पण महायुतीचा हिंदुत्ववादी विचारांचा” अशा शब्दात संदीप देशपांडे यांना भाजपकडून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलय. एकाने राज ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा एकत्रित फोटो लावत ‘हमारे संदीप भय्या के दुकान मे अनेका हा’ असं वाक्यही लिहिलं आहे.