क्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

६वी खेलो इंडिया युथ गेम्स २०२४ : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

मुलींची तेलंगणावर, तर मुलांची बिहारवर मात

चेन्नई | हर्षल देशपांडे :
महाराष्ट्राच्या दोन्ही कबड्डी संघांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करताना ६व्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये गुरुवारी विजयी सलामी देत धडाकेबाज सुरूवात केली. महाराष्ट्राच्या मुलींनी पहिल्या लढतीत तेलंगणाची ६६-१४ अशी दाणादाण उडविली, तर महाराष्ट्राच्या मुलांनी बिहारचा ४८-१९ अशा फरकाने धुव्वा उडविला. आज झालेल्या सलामीच्या लढतीमध्ये मुलींच्या गटात हरियाणाने सलामीच्या लढतीत तमिळनाडूवर ४१-२० अशी २१ फरकाने मात केली, तर मुलांच्या गटात राजस्थानने मध्यप्रदेशवर ५८-२३ असा ३५ गुणांच्या फरकाने विजय मिळविला.

चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमध्ये आजपासून खेलो इंडिया युथ गेम्समधील कबड्डी स्पर्धेला प्रारंभ झाला. मात्र, स्पर्धेचे उद्घाटन उद्या शुक्रवारी (दि.१९) होणार आहे. महाराष्ट्राच्या मुलींच्या आक्रमक खेळापुढे तेलंगणाच्या मुली निष्प्रभ ठरल्या. महाराष्ट्राची कर्णधार हरजित कौर संधू हिने अष्टपैलू खेळ करीत आपल्या नेतृत्वाला साजेसा खेळ केला. याचबरोबर समृद्धी मोहिते व आर्या पाटील यांनी खोलवर चढाया करीत गुणांचा सपाटा लावला, तर कल्याणी कडोले व भूमिका गोरे यांनी सुरेख पकडी करीत त्यांना उत्तम साथ दिली. मध्यंतराला महाराष्ट्राच्या मुलींकडे ३५-६ अशी मोठी आघाडी होती. मध्यंतरानंतर देखील हेच चित्र पहायला मिळाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुलींनी तेलंगणावर ६६-१४ अशी तब्बल ५२ गुण फरकाने बाजी मारली.

दुसरीकडे, महाराष्ट्राच्या मुलांनीही प्रतिस्पर्धी बिहार संघाला सर्वच आघाड्यांवर नामोहरम केले. गजानन कुरे व क्षितीज ठोंबरे यांच्या चौफेर चढाया आणि कर्णधार अजून गावडे व विशाल ब्राम्हणे यांच्या देखण्या पकडींपुढे बिहारच्या खेळाडूंकडे उत्तर नव्हते. त्यात वरूण खंडागळेने अष्टपैलू कामगिरी करीत आपली उपयुक्तता सिद्ध केली. महाराष्ट्राने वेगवान खेळ करीत मध्यंतरापर्यंतच २८-८ अशी जोरदार मुसंडी मारली होती. मध्यंतरानंतर बिहारच्या खेळाडूंनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाराष्ट्राने मध्यंतरापूर्वीच ४, तर मध्यंतरानंतर २ लोण चढवत बिहारवर ४८-१९ असा २९ गुणांच्या फरकाने विजय मिळवित आगेकूच केली.

उद्याच्या (दि. १९) लढती महत्वाच्या

मुलांच्या गटातून महाराष्ट्राने बिहार संघाला तर मुलींच्या गटातून तेलंगाना संघाला पराभूत केले आहे. उद्या मुलांच्या गटात राजस्थान संघाचे तर मुलींच्या गटात हरयाणा संघाचे आव्हान असणार आहे. उद्याचे दोन्ही संघांनी पहिल्या दिवशी दमदार कामगिरी बजावली आहे. त्यामुळे उद्या महाराष्ट्राच्या दोन्ही संघांच्या कामगिरीकडे कबड्डीप्रेमींच्या नजरा असतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button