breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याने सोडला प्राण

जामनेर |

बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जामनेर-बोदवड मार्गावरील ऋषिकेश नररीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जामनेर शहरापासून काही अंतरावर बोदवड रोडवरील ऋषिकेश नर्सरीजवळ सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात आठ वर्षीय नर जातीच्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतरही बिबट्या तडफडत होता. बघ्यांनी या ठिकाणी गर्दी केली. मात्र नक्की काय करावं हे न सुचल्याने कोणीही तडफडणाऱ्या बिबट्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही. बिबट्याला पाणी पाजावं का यासंदर्भात बघ्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. “त्याला पुढून लागलेलं आहे. हलतोय तो,” असं एकजण म्हणता ऐकू येतंय. तर दुसऱ्या एकाने “पाणी टाका त्याच्यावर” असं म्हटलंय. मात्र अन्य एकाने, “पाणी टाकलं तर उठून पळंल तो,” असं म्हटल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे.

वन विभागाने या बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी आलेले प्राथमिक तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी श्रीकांत व्यवहारे यांनी बिबट्याच्या मृतदेहाची पहाणी केली. त्यानंतर हा मृतदेह जामनेर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. वन विभागाच्या देखरेखीखालीच या बिबट्याचा दफनविधी करणार असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली आहे. रस्त्यावर बिबट्याला वाहनाने धडक दिल्याची माहिती मिळताच जामनेर वन विभागाचे वनरक्षक विकास गायकवाड, वनकर्मचारी चरणदास चव्हाण, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित, वनपाल प्रशांत पाटील, वनपाल पी व्ही महाजन, वनरक्षक संदीप पाटील, वनरक्षक प्रसाद भारुडे, नाकेदार अशोक ठोंबरे, वन मजूर विजय चव्हाण सुनील पालवे आदींनी घटनास्थळीला भेट दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button