मोरया महिला प्रतिष्ठानच्यावतीने सर्वसामान्यांसाठी विविध योजनांचा शुभारंभ
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम; आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व लेक लाडकी लोकोपयोगी योजना
![Morya Mahila, on behalf of the foundation, launched various schemes for the general public.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/yojna-780x470.jpg)
वडगाव (मावळ) ः मोरया महिला प्रतिष्ठानवतीने वडगाव शहरातील सर्व सामान्य कुटुंबांसाठी आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व लेक लाडकी योजनेचा शुभारंभ मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आयुष्यमान भारत योजना अंतर्गत वडगाव शहरातील पाच हजार नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना कार्ड काढून देण्यात येणार आहे. त्यासाठी मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका विविध भागांत सर्वेक्षण करणार आहेत.
तसेच लेक लाडकी योजनेंतर्गत शहरातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी या शासकीय योजनेचा मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे. दोन दिवसांत जनसंपर्क कार्यालयात सुमारे 73 रहिवाशांचे आयुष्यमान भारतचे कार्ड काढून देण्यात आले.
लेक लाडकी योजनेची माहिती देखील मिळेल…
१ एप्रिल २०२३ नंतर पिवळ्या व केसरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येक मुलीला वयाची अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून १ लाख एक हजार रुपये इतका लाभ टप्प्याटप्प्याने मिळून देण्यात येईल. लेक लाडकी या योजनेची नुकतीच घोषणा झाली असल्याने महाराष्ट्र शासनाचा शासकीय जीआर प्रसिद्ध झाल्यानंतर लेक लाडकी या योजनेची सविस्तर (अटी, शर्ती) ची माहिती देण्यात येईल. अधिक माहितीसाठी नगराध्यक्ष मयूर ढोरे जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी केले. यावेळी मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.