रेल्वेचे चाक रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प
![Konkan Railway jammed due to derailment](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/train-new-1.jpg)
रत्नागिरी – हजरत निजामुद्दीन – मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. रत्नागिरी कोकण रेल्वेच्या मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगदयामध्ये आज (शनिवार) पहाटे ४.१५ वाजता दरड कोसळल्याने रेल्वेचे चाक रुळावरून कोसळले.
या घटनेनंतर कोकण रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी तत्काळ रवाना झाली आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. पुढील काही तासात मार्ग पूर्ववत होईल असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. अपघात ऐन बोगद्यात असल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प राहणार आहे.