कोकणाला चक्रीवादळचा धोका नाही; प्रशासनाचे स्पष्टीकरण
![Konkan is not at risk of hurricanes; Explanation of administration](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Shaheen-cyclone-1.jpg)
अलिबाग | राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच कोकणात असनी चक्रीवादळाचा धोका असल्याचे फेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, कोकणाला चक्रीवादळाचा धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, येत्या दोन-चार दिवसांत कोकणाला चक्रीवादळाचा धोका आहे, अशी चर्चा आहे. मात्र, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घाबरुन जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यापूर्वी ‘निसर्ग’ आणि ‘तौक्ते’ या चक्रीवादळांमुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले होते.
अनेकांची घरे आणि उत्पन्नाचे साधन असलेली आंबा-काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यामुळेच पुन्हा चक्रीवादळ येणार, या शक्यतेने नागरिक घाबरले होते. मात्र प्रशासनाने स्पष्टीकरण दिल्यानंतर नागरिकांची जीव भांड्यात पडला आहे. एकीकडं राज्यात उन्हाची काहीली वाढत असतानाच, दुसरीकडे अरबी समुद्रामध्ये पूर्व मोसमी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं कोकण, गोव्यासह पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिह्यांमध्ये दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अशातच असनी चक्रीवादळ समुद्रकिनाऱ्यावर धडकणार असल्याने मच्छिमारांना देखील खबदारी बाळगण्याचे मेसेज व्हायरल झाले होते. मात्र, कोणताही धोका नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या कोकणातील वातावरण बघितले तर समुद्र शांत आहे. वातावरण मात्र, ढगाळ आहे. मच्छिमारांचे काम देखील सुरळीत सुरु आहे.