नाराज होऊन अलिप्त झालो नव्हतो, गेल्या सहा महिन्यांपूर्वीच माझा परदेशी दौरा ठरला होता, त्यानुसार मी परदेशी गेलो होतो – अजित पवार
![I was not disaffected and isolated, my foreign tour was scheduled six months ago, according to which I went abroad - Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Ajit-Pawar-780x470.jpg)
- दादावाचून काय अडतंय तुमचं? मला खासगी आयुष्य…, अजित पवारांचा नाराजीचा सूर
मावळ । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
४ नोव्हेंबरपासून अजित पवार नॉट रिचेबल होते. ते त्यांच्या आजोळी गेल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, ते त्यांच्या आजोळ असलेल्या देवळाली प्रवरालाही पोहोचले नसल्याची माहिती काल मिळाली. त्यामुळे अजित पवार नेमके गेले कुठे? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान, राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात शरद पवारांनी मार्गदर्शन केलं पण अजित पवार तेथे अनुपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीत मंथन शिबिर झाल्यानंतर नेते अजित पवार नॉट रिचेबल होते. मात्र, मी नाराज होऊन अलिप्त झालो नव्हतो असा खुलासा अजित पवारांनी दिला आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वीच माझा परदेशी दौरा ठरला होता, त्यानुसार मी परदेशी गेलो होतो, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. ते मावळ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या नाराजीवरून रंगलेल्या नाट्यावर त्यांनी पुन्हा नाराजीच व्यक्त केली. माध्यमांच्या प्रश्नांना त्यांनी नाराजीच्या सूरातच प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, अजित पवारांनी मावळ येथे भाषण करताना याबाबत खुलासा केला आहे. पाच – सहा वर्षांपासून परदेशात जाण्याची संधी मिळाली नाही. संधी अनेकदा आली पण कामामुळे मला जाता आलं नाही. त्यामुळे ४ नोव्हेंबरला रात्री उशीरा मी फ्लाईटने परदेशी गेलो. आणि १० तारखेला रात्री उशीराने आलो. सहा महिन्यांपूर्वीच हा दौरा ठरलेला होता. पण इथे माझ्या मागे मी नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. दादा वाचून यांचं काय अडतं काय माहित? दादाला काही खासगी लाईफ आहे की नाही? पुढे वारेमाप प्रचार केला. कारण नसताना माझी बदनामी करायची, कारण नसताना गैरसमज निर्माण करायची. सहा महिन्यांपूर्वीच तिकिटे काढली होती. म्हणून परदेशात गेलो होतो, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं.
तसंच, अजित पवार कुठे गेले याची माहिती मिळवण्याकरता माझ्या कार्यालयाशी संपर्क साधायचा होता. माझी उगाच बदनामी केली गेली, असंही अजित पवार म्हणाले. एका वृत्त संकेतस्थळाला माहिती देताना अजित पवार म्हणाले की, मला मध्यंतरी खोकला होता. मी आजारी होतो. पण नंतर मी सहा महिन्यांपूर्वी ठरल्याप्रमाणे दौऱ्याला गेलो. पण इथे काहीही बातम्या दिल्या गेल्या.