breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाली कशी? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

नाशिक – नाशिकच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन गळती झाल्याने २४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन गळती झाल्याने व्हेंटिलटरपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होऊ न शकल्याने रुग्णांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी जबाब नोंदवले जात आहेत.

या घटनेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची उच्चस्तरीय समितीदेखील तातडीने स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान ऑक्सिजन गळती नेमकी कशी झाली याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. सीसीटीव्हीमध्ये कर्मचारी टाकीत ऑक्सिजन भरत असतानाच अचानक गळती सुरु झाल्याचं दिसत आहे. तसंच यानंतर कर्मचाऱ्यांची झालेली धावपळही स्पष्ट दिसत आहे.

बुधवारी दुपारी ऑक्सिजनच्या टाकीला गळती होऊन रुग्णालयात हाहाकार उडाला होता. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू तांडवामुळे नातेवाईक, रुग्णालय व्यवस्थापनासह प्रशासकीय यंत्रणाही हादरली. रात्री उशिरापर्यंत आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, अन्न-औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींचे भेटसत्र सुरू होते. गुरूवारी रुग्णालयात शांतता असली तरी दुर्घटनेची छाया प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. धास्तीमुळे दाखल झालेले रुग्णांचे नातेवाईक आवारात ठाण मांडून होते. पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला. प्राणवायूच्या टाकीतील गळती तज्ज्ञ अभियंत्यांनी सव्वा ते दीड तासात बंद केली होती.

१३ किलो लिटर क्षमतेची टाकी पुण्यातील टायो निपॉन सान्सो कॉर्पोरेशनकडून १० वर्षासाठी भाडेतत्वावर घेण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी ही व्यवस्था कार्यान्वित झाली. प्राणवायूच्या टाकीतील गळतीस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची हलगर्जी, निष्काळजी यांमुळे हे मृत्यू झाल्याचे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे. तपासासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्या नेतृत्वाखाली तीन पथकांची स्थापना करण्यात आली. पथकांनी मृतांचे नातेवाईक, रुग्णालय व्यवस्थापनातील अधिकारी, कर्मचारी यांचे जबाब नोंदविण्यास सुरूवात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button