मरीन ड्राइव्हवर पहाटे भीषण अपघात; दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

मुंबई | दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. वेगाने धावणाऱ्या दुचाकीने पादचाऱ्यासह इतर वाहनांना धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस सूत्रांनुसार, ही घटना पहाटे सुमारे ५.४० वाजता एन. एस. रोडवरील पारसी जिमखाना जंक्शन सिग्नलजवळ घडली. दुचाकीस्वार अत्यंत बेदरकारपणे वाहन चालवत होता. सिग्नलचे उल्लंघन करत त्याने मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका वृद्ध पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही दुचाकी इतर दोन स्कुटींनाही धडकली.
हेही वाचा
भाजप उमेदवार नावनिश्चितीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीत
या तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघे आणि पादचारी वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकाने जखमींना जवळच्या जे. टी. रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारांपूर्वीच तिघांचाही मृत्यू झाला.
MH01EL6366 या नोंदणी क्रमांकाची मोटारसायकल अपघातात सहभागी असल्याचा दावा वृत्तसंस्थांनी केला आहे. अपघातामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, अतिवेग आणि सिग्नल उल्लंघन हे अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे. मृतांची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नसून, पुढील तपास सुरू आहे.





