#HijabRow: “या सगळ्या समस्यांवर एकमेव तोडगा म्हणजे…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट व्हायरल!
![#HijabRow: “या सगळ्या समस्यांवर एकमेव तोडगा म्हणजे…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट व्हायरल!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/aawhad-1.jpg)
मुंबई |
कर्नाटकमधील हिजाब वाद सध्या देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. उडुपीमधील एका महाविद्यालयाने हिजाब घातलेल्या मुस्लीम मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारल्यानंतर त्यावरून देशभर राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. देशाच्या संसदेत देखील या मुद्द्याचे पडसाद उमटल्यानंतर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात केलेलं एक ट्वीट सध्या व्हायरल होऊ लागलं आहे. विशेष म्हणजे, या सगळ्या समस्येवर जितेंद्र आव्हाडांनी सुचवलेला खोचक उपाय चर्चेचा विषय ठरला आहे.
- काय म्हणाले आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी या संपूर्ण हिजाब वादाच्या अनुषंगाने भाजपावर निशाणा साधणारं ट्वीट केलं आहे. “मुलींनी स्कर्ट घालणं त्यांना नको आहे, मुलींनी जीन्स घालणं त्यांना नको आहे, मुलींनी हिजाब घालणं त्यांना नको आहे. एवढं आहे तर या सगळ्या समस्यांवर सगळ्यात चांगला तोडगा म्हणजे तुम्ही थेट ड्रेस डिझायनिंग मंत्र्यांचीच नियुक्ती करून टाका”, असं आव्हाड म्हणाले आहेत.
They don’t want girls to wear skirts
They dont want them to wear jeans
They don’t want girls to wear hijab
The best is appoint a minister of dress designing a solution to all problems #BJPHateFactory #HijabIsIndividualRight #हिजाब_से_दर्द_क्यों #Justice— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 9, 2022
बुधवारी लोकसभेमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या मुद्द्यावरून टीका केली आहे. तसेच, महिलांच्या कपड्यांविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कर्नाटक भाजपाचे आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांच्यावरही त्यांनी तोफ डागली. “महिलांच्या काही कपड्यांमुळे पुरूष उत्तेजित होतात आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होते”, असं विधान रेणुकाचार्य यांनी केलं होतं. या विधानाचा सुप्रिया सुळे यांनी संसदेत निषेध केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली असून त्यातून केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे.