पुढील 72 तास धोक्याचे! महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; कोकणासह या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

मुंबई | महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार पुढील 72 तास राज्यातील हवामान धोकादायक ठरू शकते. कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, 19 ऑक्टोबरपर्यंत ती कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या प्रणालीचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागावर होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.
हेही वाचा : तळवडेसह औद्योगिक पट्टयातील वीज सक्षमीकरणासाठी ‘‘बुस्टर’’
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात शुक्रवारी सकाळपासूनच हलक्या सरींना सुरुवात झाली असून, पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक बाहेर पडू नये, असा इशारा दिला आहे.
अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. तोंडाशी आलेले भातपिक या पावसामुळे धोक्यात आले असून, आधीच कापणी केलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हवामान विभागाने नागरिकांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.




