हार्डवेअर आणि छत्र्या-रेनकोटची दुकाने सुरू ठेवता येणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/umbrella-shop.jpg)
मुंबई – राज्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागतोय. तसेच, ग्राहकांचीही गैरसोय होतेय. त्यामुळे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला असून यापुढे छत्री, रेनकोट व्यापारांनाही दुकाने उघडता येणार आहेत.
तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील, अशा साहित्यांची दुकाने आणि व्यवसाय सुरु करण्यास सरकारने परवानगी देऊ केली आहे. त्यामुळे आता शहरांमध्येही हार्डवेअर आणि पावसाळी साहित्याची दुकाने सुरु करता येतील. अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी देण्यात आलेल्या वेळेतच ही दुकाने सुरु राहतील. मात्र, कोविड नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल.
राज्य सरकारने छत्र्या, ताडपत्री आणि रेनकोटची दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात घरांची शाकारणी, त्याचप्रमाणे शहरी भागात गळती असणाऱ्या ठिकाणी ताडपत्री लावून बंदोबस्त करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या दुकानांचा अत्यावश्यक दुकानांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.