सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
![Happy Rakshabandhan to all…!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/rakhi-raksha-bandhan-1565610628.jpg)
रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा सण. मात्र देशभरातील कोरोनाचा कहर पाहता यंदाही रक्षाबंधन घरच्या घरीच साजरा करावा लागणार आहे. तसेच गोडाचे पदार्थही घरीच बनवावे लागणार आहेत. त्यामुळे आज खास आपल्या भावासाठी किंवा बहिणीसाठी झटपट ब्रेड खवा रोल आणि नारळी भात कसा बनवायचा, हे जाणून घेऊया.
ब्रेड खवा रोल
ब्रेड खवा रोल बनविण्यासाठी चार ब्रेड स्लाईस, एक वाटी खवा, एक मोठी वाटी दूध, एक कप साखर, काजू, बारीक कापलेले बदाम, वेलची पावडर, अर्धा कप पाणी, तळण्यासाठी तूप, इत्यादी साहित्य घ्यावे.
आता पहिल्यांदा मध्यम आचेवर पॅन गरम करून त्यात साखर आणि पाणी उकळून घ्या. एक तारी पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. मग दुसऱ्या पॅनमध्ये खवा चांगला भाजून घ्या. हा खवा थंड झाल्यानंतर त्यात साखर, वेलची आणि ड्राय फ्रुट्स घालून हाताने त्याचे लहान लहान गोळे तयार करा. आता एका खोल भांड्यात दूध घेऊन त्यात हाताने दाबलेले ब्रेड बुडवून बाहेर काढा. ते चांगले पिळून त्यामध्ये खव्याचे गोळे टाका. मग त्यांचे ब्रेड रोल प्रमाणे रोल बनवा. आता कढईत तूप गरम करून त्यात हे ब्रेड रोल तळून घ्या. त्यानंतर हे रोल साखरेच्या पाकात बुडवून ठेवा. थोड्या वेळाने तुमचे ब्रेड चमचम खाण्यासाठी तयार असतील.
नारळीभात
नारळीभात बनवण्यासाठी बासमती तांदूळ दोन वाट्या, भाताच्या दुप्पट म्हणजेच चार वाट्या पाणी, दोन ते तीन लवंग, किसलेला गूळ दोन वाटी, खवलेले ओले खोबरे २ वाट्या, सजावटीसाठी काजू आणि बेदाणे, इत्यादी साहित्य घ्या.
आता पहिल्यांदा तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून चाळणीत निथळत ठेवा. मग भात बनविण्यासाठी जाड बुडाचे पातेले घ्या, जेणेकरून भात भांड्याला चिकटणार नाही. या पातेल्यात तूप गरम करून त्यात लवंग घाला आणि निथळलेले तांदूळ घालून परतून घ्या. परतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून माध्यम आचेवर भात शिजवून घ्या. भात शिजला की तो परातीत मोकळा करून घ्या. या भातात खवलेला नारळ, गूळ, वेलचीची पूड घालून छान मिक्स करून घ्या. आता दुसऱ्या एका पातेल्यात तूप घालून त्यात काजू आणि बेदाणे परतून घ्या. छान परतून झाल्यानंतर ते एका वाटीत काढा आणि उरलेल्या तुपात हा भात टाका. त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. १५ मिनिटांनी या भातात तळलेले काजू व बेदाणे घाला आणि गॅस बंद करा. आता तुमचा गरमा गरम नारळीभात तयार आहे.