#GOOD NEWS: ‘वार्षिक कर भरणाऱ्या वाहन मालकांना करमाफी’, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/images-9.jpeg)
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यात टाळेबंदीच्या (लॉकडाऊन) पार्श्वभूमीवर वार्षिक कर भरणाऱ्या वाहन मालकांना करमाफीपासून नाशिक जिल्ह्यात कृषि विज्ञान संकुल निर्मितीपर्यंत अनेक निर्णयांचा देखील समावेश आहे. कोरोनामुळे राज्यात तयार झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देखील काही उपाययोजना या बैठकीत करण्यात आलेल्या आहेत.
राज्याच्या शहरी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व्हावी म्हणून मंत्रिमंडळाने शहरी भागातील आरोग्य विभागात 7 नियमित पदांच्या निर्मिती करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. या निर्णयानुसार संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालकांसह 7 पदांची निर्मिती होईल. यामुळे आरोग्य विभागाच्या व्यवस्थापनात मोठी मदत होणार आहे. याशिवाय राज्यातील मच्छिमारांना विशेष सानुग्रह अनुदान देण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे. अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळालेली आहे. मागील मोठ्या काळापासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन ने मच्छिमारी व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळबैठक pic.twitter.com/GAHF3v5otX
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 26, 2020
वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी करमाफी देण्याचाही मोठा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांना मदत व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. टाळेबंदीमुळे अतिरीक्त होणाऱ्या दूधापैकी प्रतिदिन 10 लाख लिटर दूध स्वीकारणे आणि त्याचं रुपांतर करण्याच्या योजनेला देखील ऑक्टोबरपर्यंत मान्यता देण्यात आली आहे. मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील 8 महानगरपालिका आणि 7 नगरपालिका क्षेत्रांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे.
नाशिक जिल्ह्यातील काष्टी (ता.मालेगाव) येथे कृषि विज्ञान संकुल निर्मिती होणार आहे. यालाही बैठकीत मान्यता मिळाली आहे. याअंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांची स्थापना होणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- राज्याच्या शहरी भागातील आरोग्य सेवेसाठी ७ नियमित पदांच्या निर्मितीस मान्यता. संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक या पदांचा समावेश.
- राज्यातील मच्छिमारांना मिळणार विशेष सानुग्रह अनुदान, मंत्रिमंडळाकडून अनुदान देण्यास मान्यता.
- वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी मिळणार करमाफी. टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर निर्णय.
- टाळेबंदीमुळे अतिरीक्त होणाऱ्या दूधापैकी प्रतिदिन 10 लाख लिटर दुध स्विकारणे आणि रुपांतर योजना ऑक्टोबरपर्यंत राबविण्यास मान्यता.
- मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील 8 महानगरपालिका व 7 नगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता.
- नाशिक जिल्ह्यातील काष्टी (ता.मालेगाव) येथे कृषि विज्ञान संकुल निर्मितीस मान्यता. याअंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांची होणार स्थापना.