सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ सुरूच
दिवाळी सोन्याविनाच, सोनं, चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

मुंबई : सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ सुरूच आहे, आज देखील सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ पाहयला मिळत आहे. गेल्या नऊ महिन्यांमध्ये सोन्या-चांदीचे भाव तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत. याचा मोठा फायदा हा सोन्यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना होताना दिसून येत आहे. आता सोन्यामधून मोठा परवा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र अजूनही सोन्याचे भाव वाढू शकतात असा अंदाज असल्यानं सोन्यामधील गुंतवणूक सुरूच आहे.
जळगावच्या सराफा बाजारात गेल्या नऊ महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 31 हजार 800 रुपये तर चांदीच्या दरात 40 हजार 300 रुपयांनी वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात सोन्याचे दर 78 हजार 500 रुपये प्रति तोळा आणि चांदीचा दर 89 हजार 500 रुपये प्रति किलो एवढे होते. नऊ महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. आज सोन्याचे दर विना जीएसटी प्रति तोळा 1 लाख 10 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 29 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
गेल्या नऊ महिन्यांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात तब्बल 35 ते 40 टक्क्यांची वाढ झाली असल्याचं जळगावमधील सराफा व्यवसायिकांनी सांगितले आहे. केवळ नऊ महिन्यात सोन्याचे दर तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्यामुळे सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना याचा चांगला परतावा देखील मिळत असल्याचं सराफा व्यावसायिकांनी म्हटलं.
रशिया युक्रेन युद्ध, डॉलरच्या दरात झालेली वाढ तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट संदर्भातलं धोरण या सर्व गोष्टींचा सोन्या आणि चांदीच्या दरावर परिणाम झाला आहे. जागतिक परिस्थिती सातत्यानं बदलत असल्यामुळे सोन्या-चांदीचे दर देखील वाढत असल्याचं सराफा व्यावसायिकांचं म्हणणं आहे. दरम्यान दिवाळीत सोन्याचे दर सव्वा लाख तर चांदीचे दर दीड लाखांपर्यंत पोहोचतील असा अंदाज देखील सराफ व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.
सोन्याच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे बजेट कोलमडले आहे, हौस कशी पूर्ण करायची असा सवाल आता महिलांकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून सोन्याचे दर सतत वाढत असल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे, कुठेतरी सोन्याचे दर कमी झाले पाहिजे अशी अपेक्षा देखील यावेळी महिलांनी व्यक्त केली आहे.