“राज्यातही आम्हाला पॅकेज द्या म्हटल्यावर मुख्यमंत्री म्हणतात…”; रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका
![“राज्यातही आम्हाला पॅकेज द्या म्हटल्यावर मुख्यमंत्री म्हणतात…”; रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Raosaheb-Danve-Uddhav-Thackeray-1.jpg)
मुंबई |
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. विना मुख्यमंत्र्यांचे कुठे राज्य चालत असते का असा सवाल करत मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत शिवसेनेच्या एक मंत्र्यांचा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली असती तर हे राज्य चालले नसते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.
“हे काय म्हणतात, आमचं कुटुंब आमची जबाबदारी. मुख्यमंत्री परभणीला आले त्यांना हॉटेलवाले भेटले. त्यांनी सांगितले कर्ज काढून हॉटेल बांधले. बॅंकवाले कर्जासाठी चकरा मारत आहेत. आम्हाला पॅकेज द्या. मोदींनी जसं पॅकेज दिलं तसं राज्यातही आम्हाला पॅकेज द्या आणि मुख्यमंत्री म्हणतात आपलं कुटुंब आपली जबाबदारी. हा मुख्यमंत्री कुटुंबाचा जबाबदार आहे की राज्यातल्या १२ कोटी लोकांचा जबाबदार आहे हे मला तुम्ही सांगा. असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला. आता तर दोन महिन्यांपासून कुठे आहे पठ्ठ्या हे काहीच सांगू शकत नाही कुणी,” असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. बिना मुख्यमंत्र्याचं कुठं राज्य चालत का, या तीन महिन्यात कोण्या शिवसेनेच्या मंत्र्याला चार्ज दिला असता तर राज्याचा राज्यकारभार नीट चालला नसत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. करोना काळात केंद्राप्रमाणे राज्यानेही पॅकेज जाहीर करायला हवे होते असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी करोना काळात अन्नधान्याचा साठा किती आहे, त्यावर विचारणा केली होती. देशात दोन-तीन वर्ष पुरेल एवढा साठा असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी करोना काळात मोफत अन्न धान्य द्यावे अशी सूचना केली आहे असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. करोनाचे संकट कायम असेपर्यंत ही योजना सुरू ठेवावी असेही मोदी यांनी म्हटले होते, असेही दानवे यांनी सांगितले.