बीड पुन्हा हादरलं! कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाकडून मुलीचं लैंगिक शोषण!

बीड | खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून बीड शहरात हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. सदर प्रकरणानंतर पालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सदर घटनेच्या निषेधार्थ बीडमधील कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले असून कोचिंग क्लासेस परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हेही वाचा : पुरीतील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 40 पेक्षा जास्त भाविक बेशुद्ध
मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकांच्या अटकेसाठी विशेष पथक रवाना केले आहे.
दरम्यान, आरोपी शिक्षक विजय पवार हा विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ता असून त्याचे अनेक फोटो सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे.





