breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

दर पडल्याने सिमला मिरचीचे फुकट वाटप

सांगली |

मागणीअभावी बाजारातील दर पडल्याने फडात तयार झालेल्या सिमला (ढबू) मिरचीचे करायचे काय? असा प्रश्न पडलेल्या येथील एका शेतकऱ्याने चक्क ट्रॉलीने सिमला मिरची कुंडलसह विविध ठिकाणी फुकट वाटली. फुकापासरी मिळणारी सिमला मिरची घेण्यासाठी लोकांचीही झुंबड उडाली. करोना संकटामुळे बाजारपेठ अस्थिर झाली आहे. त्यातच दिल्ली बाजारात सिमला मिरचीला अवघा सहा रुपये दर मिळत असल्याने पेठेत पाठवली जाणारी मिरची स्थानिक बाजारात विक्रीसाठी आणली जात आहे. सांगली, मिरज शहरातही या मिरचीला सौद्यामध्ये पन्नास रुपये प्रति दहा किलोच्यावर दर मिळेना झाला आहे. यात काढणी करून वाहतुकीने बाजारात आणण्यासाठी शेतकऱ्याला पदरमोड करावी लागत असल्याने तयार झालेल्या मिरचीचे करायचे काय? असा प्रश्न उत्पादक शेतकऱ्यासमोर पडला आहे.

कडेगाव तालुक्यातील कुंभारगाव हे गाव भाजीपाल्याचे माहेरघर म्हटले जाते, येथील शेतकरी भीमराव साळुंखे हे दरवर्षी २५ गुंठे ढोबळी मिरचीची लागवड करतात, ही मिरची ते मुंबई, पुणे येथे पाठवतात. वाहतूक, पॅकिंग, मजुरी यासाठी ६ रुपये किलोला खर्च येतो. या वर्षी या भागासह मिरज व तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनीही सिमला मिरचीची लागवड केली असून यंदा हवामान पोषक असल्याने पीकही मुबलक आले आहे. एकाच वेळी हे पीक आल्याने बाजारातील दर गडगडले आहेत. आज ना उद्या बाजारात तेजी येईल म्हणून आलेले पीक राखणे किंवा नवी लागवड करण्यासाठी तयार माल काढण्याविना गत्यंतर नसल्याने साळुंखे यांनी सुमारे पाच टन माल ट्रॉलीतून कुंडलच्या बाजारात आणला. फुकट घ्या अशी आरोळी ठोकून भीमराव साळुंखे यांनी ट्रॉलीतून सिमला मिरची अंबक, चिंचणी, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव, कुंडल येथील बाजारात फुकट वाटली. फुकापासरी मिळणारी सिमला मिरची घेण्यासाठी लोकांचीही झुंबड उडाली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button