जालना जिल्ह्यात पाच लाख टन ऊस अतिरिक्त ठरण्याची शक्यता
![जालना जिल्ह्यात पाच लाख टन ऊस अतिरिक्त ठरण्याची शक्यता](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sugar-factory-.jpg)
- मंठा भागातील प्रश्न गंभीर
जालना |
जिल्ह्यात तीन सहकारी आणि दोन खासगी साखर कारखाने असले तरी चालू हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. समर्थ आणि सागर या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात त्याचप्रमाणे मां बागेश्वरी या खासगी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या परतूर आणि मंठा तालुक्यांत अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा राहिलेला आहे.
अंबड तालुक्यातील कै. अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना आणि या कारखान्याचे युनिट असलेल्या घनसावंगी तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जवळपास सात लाख टन ऊस अतिरिक्त ठरण्याचा अंदाज आहे. जायकवाडी जलाशयातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत उसाची लागवड मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. या दोन्ही कारखान्यांत गेल्या मंगळवापर्यंत जवळपास आठ लाख ८० हजार टन उसाचे गाळप झाले. यापैकी पाच लाख ४० हजार टन गाळप कै. अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्यात तर तीन लाख ४० हजार टन उसाचे गाळप सागर सहकारी साखर कारखान्यात झाले. या दोन्ही साखर कारखान्यांच्या क्षेत्रात जवळपास २२ लाख टन उसाची उपलब्धता होती. यापैकी १५ लाख टन गाळप होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त ठरणाऱ्या सात लाख टन उसापैकी दोन लाख टन ऊस गुऱ्हाळ तसेच बेणे इत्यादींसाठी लागला तरी पाच लाख टन ऊस अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.
गेल्या हंगामातही अतिरिक्त ठरणाऱ्या उसाच्या विल्हेवाटीसाठी अंबड आणि घनसावंगी बाहेरच्या अनेक करखान्यांशी करार करण्यात आले होते. कारखान्याचे सभासद नसलेल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या संदर्भात प्रामुख्याने असे करार करण्यात आले होते. चालू हंगामातही समर्थ आणि सागर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊस अनुराधा, गोकुळ, गंगाबाई, बारामती अॅग्रो, लक्ष्मी-नृसिंह इत्यादी अन्य जिल्ह्यांतील साखर कारखान्याकडे पाठविण्याचे नियोजन आहे. अलीकडेच अतिरिक्त ऊस गाळपाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने १३ साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. परतूर तालुक्यातील माँ बागेश्वरी खासगी साखर कारखान्यात आतापर्यंत चार लाख टन उसाचे गाळप झाल्याची माहिती आहे. निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्याचप्रमाणे परतूर आणि मंठा तालुक्यांतही उसाची लागवड वाढलेली आहे. भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्यासमोर मागील हंगामाप्रमाणे या वर्षीही अतिरिक्त उसाचा प्रश्न नसेल, अशी माहिती आहे. परंतु चांगल्या पावसामुळे या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चालू हंगामात उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. घनसावंगी तालुक्यातील समृद्धी खासगी साखर कारखाना परिसरातही चालू वर्षी उसाची लागवड वाढलेली आहे.
- चार तालुक्यांत उसाचा प्रश्न…
जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर आणि मंठा तालुक्यांत चालू हंगामात अतिरिक्त ऊस मोठय़ा प्रमाणावर आहे. गाळप होणे शक्य नसणाऱ्या या उसाच्या विल्हेवाटीसाठी संबंधित शासकीय यंत्रणा आणि साखर कारखान्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केले पाहिजे. बाहेरील कारखान्यांमध्ये गाळपासाठी ऊस पाठविणे या हंगामात मागील हंगामाप्रमाणे सोपे राहिलेले नाही. कारण त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातही ऊस वाढलेला आहे.
– लक्ष्मण वडले, शेतकरी नेते