थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार
पंतप्रधान कार्यालायाच्या माध्यमातून न्यायहक्कासाठी तक्रार करू शकता

मुंबई : “सरकारी काम आणि चार दिवस नाही तर चार महिने थांब” याचा अनुभव तुम्हाला हमखास आला असेल. सरकारी अधिकारी, कर्मचारी हे त्रास देण्यासाठी आणि पैसा उकळण्यासाठीच पगार घेतात असा सामान्यांचा रोजचा अनुभव आहे. सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवल्यावरही अनेकदा कामं होत नाही. चिरीमिरी दिल्याशिवाय कर्मचारी कामाला हात लावत नाहीत. अशावेळी तुम्ही थेट पंतप्रधान कार्यालयाकडे रीतसर तक्रार करू शकता. त्यासाठीची कागदपत्रं ही तुम्हाला पाठवता येतील. तर एखादा अधिकारी पैसे मागत असेल तर त्यासंबंधीचा पुरावा सादर करता येईल. त्याची थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करता येईल. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, असा पंतप्रधानांचा (PM Narendra Modi) नारा आहे. त्याचा अनुभव तुम्हाला घेता येईल. त्यासाठी अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागले.
PMO कडे तक्रार
पंतप्रधान कार्यालयाकडे(PMO) तक्रार करता येईल. तुमचे प्रलंबित सरकारी काम अथवा तक्रार ऑनलाईन माध्यमातून करता येईल. पंतप्रधान कार्यालय नागरिकांना तक्रारी आणि सूचना मांडण्यासाठी विविध सुविधा देते. त्याआधारे तुम्हाला थेट पंतप्रधानांपर्यंत तक्रार करता येते. तुमच्या अडचणी आणि पिळवणूक याची माहिती देता येते. नाहक तुमची अडवणूक होत असेल तर त्याची तक्रार करता येते.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
अशी करा पंतप्रधानांकडे तक्रार
PMO कडे ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी नागरिकांना पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत साईटवर https://www.pmindia.gov.in/hi जावे लागेल
पीएमओच्या होमपेजवरील पंतप्रधानांशी साधा संवाद या पर्यायावर क्लिक करा
पुढे पंतप्रधानांना लिहा या पर्यायावर क्लिक करा
या ऑप्शनवर क्लिक केल्याने CPGRAMS पेज उघडेल, या ठिकाणी तुम्हाला तक्रार नोंदवता येईल.
तक्रार दाखल झाल्यानंतर, पीएमओ एक नोंदणी क्रमांक तयार करेल. या तक्रार क्रमांकावरून तुमच्या तक्रारीवर काय कारवाई झाली याविषयीची माहिती घेता येईल.
तक्रार करतेवेळी पीएमओ संकेतस्थळावर तक्रारीशी संबंधित कागदपत्रे देखील अपलोड करता येईल
ऑनलाइन व्यतिरिक्त अशी तक्रार दाखल करा
ऑनलाईन तक्रार दाखल करायची नसेल तर पंतप्रधान कार्यालयाला लेखी तक्रार दाखल करता येईल. टपाल कार्यालयाद्वारे, खासगी कुरियर अथवा फॅक्सचा वापर करुन तुम्हाला तक्रार दाखल करता येईल. तक्रारकर्ते पंतप्रधान कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली, पिन कोड 110011 या पत्त्याचा वापर करू शकता. तर फॅक्स करण्यासाठी, तुम्ही 01123016857 या फॅक्स क्रमांकाचा वापर करता येईल. तुम्ही थेट पंतप्रधान कार्यालयाच्या साउथ ब्लॉक, नवी दिल्ली येथील तक्रार पेटीचा वापर करू शकता.
तुमच्या तक्रारीवर प्रक्रिया कशी होते
ऑनलाईन अथवा ऑफलाईन सादर झालेल्या तक्रारींचा निपटारा पंतप्रधान कार्यालयांकडून करण्यात येते. त्यासाठी स्वतंत्र पथक आहे. हे पथक तक्रारींची चौकशी आणि व्यवस्थापनाचे काम पाहते. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी पथकाकडून विविध मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारांशी संवाद साधते. जर तक्रार कारवाईयोग्य असेल तर ती CPGRAMS द्वारे संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते. नागरिक http://pgportal.gov.in/ViewStatus.aspx या वेबसाइटवर त्यांचा नोंदणी क्रमांक टाकून त्यांच्या तक्रारीची सध्यस्थिती तपासू शकतात.