संत निळोबारायांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान…
![Departure of Sant Nilobaraya's Palkhi ceremony to Pandharpur ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/nagar-1-5.jpg)
पारनेर |
टाळ मृदंगांच्या ठेक्यावर, विठ्ठल रखुमाई व विविध संतांच्या जयघोषात तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबारायांच्या पालखी सोहळ्याने सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत एसटी महामंडळाच्या दोन शिवशाही गाडय़ांमधून संत निळोबारायांच्या पादुकांसह चाळीस वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले.
प्रस्थानापूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय दंडाधिकारी सुधाकर भोसले यांच्या हस्ते संत निळोबारायांच्या समाधीची व पादुकांची, समाधी मंदिरात विधिवत महापूजा करण्यात आली. तहसीलदार ज्योती देवरे, देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, संत निळोबारायांचे वंशज गोपाळबुवा मकाशीर, राळेगणसिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी,जि.प.सदस्य राणी लंके उद्योजक सुरेश पठारे, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य दिनेश औटी, दत्ता आवारी, सुरेश ज्ञानदेव पठारे, सुभाष गाजरे, लक्ष्मण खामकर, चांगदेव शिर्के, पांडुरंग रासकर आदी उपस्थित होते.
संत निळोबारायांचे वंशज गोपाळबुवा मकाशीर यांनी पहाटे पाच वाजता संत निळोबारायाच्या समाधीची व पादुकांची विधिवत पूजा केली. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता विकासानंद मिसाळ महाराजांचे प्रस्थानाचे कीर्तन रंगले. प्रस्थानाच्या कीर्तनानंतर मुख्य प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. महापूजेनंतर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी संत निळोबारायांच्या पादुका डोक्यावर घेऊन शिवशाही बसमधील सजवलेल्या आसनावर नेऊन ठेवल्या. यावेळी पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा, प्रस्थान सोहळ्यास उपस्थित असलेल्या वारकऱ्यांचा टाळ, मृदंगाच्या तालावर विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निळोबारायांचा जयघोष सुरू होता. संत निळोबारायांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.