पूजा खेडकरला मोठा दिलासा, २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
![Delhi High Court directs police not to arrest Pooja Khedkar till August 21](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Pooja-Khedkar-780x470.jpg)
पुणे | बडतर्फ सनदी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. यूपीएससीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरला अटक होणार होती. या अटकेला पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी पूजा खेडकरला २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद निकाल देताना म्हणाले, सध्यातरी पूजा खेडकर यांना तात्काळ कोठडीत टाकावे, अशी परिस्थिती दिसत नाही. यूपीएससीची बाजू मांडणारे वकील नरेश कोशिक यांना प्रश्न विचारताना न्यायमूर्तींनी म्हटलं की, सत्र न्यायालयाने दिलेला निकाल आम्ही वाचला. यातून जो गुन्हा घडला त्यात जामीन मिळावा किंवा मिळू नये, याबाबत स्पष्टता आलेली नाही. आज न्यायालयात या प्रकरणात जे तथ्य मांडले गेले आहेत, त्यावरून फिर्यादीची पुढच्या तारखेपर्यंत (२१ ऑगस्ट) अटक केली जाऊ नये, असे न्यायालयाने म्हटले.
हेही वाचा – ५ महिने १० सामने, भारतीय संघाची ‘कसोटी’; WTC फायनलसाठी ‘या’ ३ संघांचं आव्हान
https://x.com/ddsahyadrinews/status/1822889439061749799
पूजा खेडकर यांनी यूपीएससीकडे खोटे पुरावे सादर करून नियमापेक्षा अधिकवेळा परीक्षा दिली, असा आरोप यूपीएससीकडून केला गेला होता. या आरोपानंतर जेव्हा गुन्हा दाखल झाला. तेव्हा दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाने त्यांची चौकशी करण्याचा निकाल दिला होता. खोटी ओळख धारण करून वारंवार परीक्षा देणे, हा गंभीर गुन्हा असून आरोपीला अटक करून हा कट उघड केला गेला पाहीजे, असेही सत्र न्यायालयाने म्हटलं होते.