निगडी येथे ठेकेदाराकडून केबलसाठी बेकायदा खोदकाम; कारवाईची मागणी
पिंपरी : निगडी अमरधाम स्मशानभूमी पासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहत पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तांत्रिक पद्धतीने केबलसाठी विनापरवाना खोदकाम करण्यात आले आह. यामुळे खोदकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
दिपक खैरनार यांनी आयुक्तांकडे यासंबंधित तक्रार केली आहे. निगडी अमरधानम समोरील रस्त्यावर ठेकेदाराकडून केबलसाठी बेकायदा खोदकाम करण्यात आले आहे. तसेच या खोदकामातून निघालेला मातीचा साठा रस्त्यावर टाकला आहे. याचा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. खोदकाम करण्यात येत असलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स, ब्लिंकर, सुचना फलक नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या कामाच्या अनियमिततेमुळे आक्षेप घेतला होता. तसेच नागरीकांच्या तक्रारीनंतर आम्ही संबंधित खोदकामाच्या ठिकाणी जात खोदकाम करीत असलेल्या मजुरांकडे खोदकामाच्या परवाण्याबाबत विचारणा केली. पण, त्यांच्याकडे परवाना नव्हता.
सदर कामासाठी ठेकेदाराने नेमलेले सुपरवायझर मयुर जाधव तसेच महापालिकेच्या झो. नि. पू. विभागाचे समीर दळवी यांना आम्ही संपर्क साधला असता त्यांच्याकडून सदर कामास परवानगी देण्यात आली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या सर्व प्रकारातून कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता बिनधास्तपणे कोणीही या आणि रोडची खोदाई करा, असंच सुरू आहे. तरी या तक्ररीची दखल घेत बेकायदेशीर खोदकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.