दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार परीक्षा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून 12 वीची परीक्षा 9 एप्रिल 2026 पर्यंत चालणार आहे. 10 वीच्या परीक्षा 17 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत पार पडतील.
विशेष म्हणजे, परीक्षा सुरू होण्याच्या तब्बल चार महिन्यांपूर्वीच वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय तारखा CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर पाहता आणि डाउनलोड करता येतील. परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होऊन दुपारी 12.30 किंवा 1.30 पर्यंत चालेल.
या वर्षी देशासह 26 देशांतील सुमारे 45 लाख विद्यार्थी CBSE बोर्ड परीक्षेला बसणार आहेत. एकूण 204 विषयांसाठी परीक्षा घेण्यात येणार असून, प्रात्यक्षिक परीक्षा, मूल्यमापन आणि निकालाची जबाबदारीही CBSE बोर्डाकडेच राहणार आहे.
हेही वाचा – डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ आता “ज्ञान प्रसाद ग्लोबल यूनिव्हर्सिटी”!
महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही आपल्या परीक्षांच्या तारखा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार, 12 वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार आहे, तर 10 वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत घेण्यात येईल.
यंदा दोन्ही परीक्षा नेहमीपेक्षा दोन आठवडे लवकर सुरू होत आहेत. शिक्षण मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक आगाऊ जाहीर करून विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध तयारीसाठी पुरेसा अवधी उपलब्ध करून दिला आहे.




