#COVID19 : महाराष्ट्राचा सुपुत्र शरद पवार जनसामान्यांसाठी धावला, राष्ट्रवादीचा मोठा निर्णय!
आमदार, खासदारांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा होणार
मुंबई। महाईन्यूज । प्रतिनिधी
महाराष्ट्र ज्या-ज्या वेळी संकटात असतो, त्यावेळी धावून येणारा नेता म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेसाठी धावून आले आहेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सहाय्यता कार्यास हातभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे पत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना देण्यात आले आहे.
श्री. पवार यांनी आदेश वजा पत्रात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून, शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढावले आहे. या अभूतपूर्ण संकटावेळी राष्ट्रवादी पक्ष जनतेसोबत ठाम उभा आहे.
राष्ट्रवादी पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदस्यांना कळवण्यात येते की, सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करावेत.